हैदराबाद - जगभरात तसेच देशातही कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. देशातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, रविवारी देशात 48 हजार 661 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 13 लाख 85 हजार 522 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना नमुना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची सूचना केली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांपर्यंत कमी कालावधीत पोहोचणे शक्य झाले असून त्यांच्यावर वेळेवर उपचारही केले जात आहेत. त्यातून मृत्युदरही कमी करण्यात यश आले आहे.
देशातील वैज्ञानिक कोरोनावर लस शोधण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यांना त्यात लवकरच यश येईल अशी आशा आहे. सध्या भारत हा जगातील क्रमांक तीनचा देश आहे, जिथे सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे.
पाहूयात कोरोनासंबंधी राज्यनिहाय ठळक घडामोडी..
महाराष्ट्र
- नवी मुंबई - देशभरासह राज्यात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात तब्बल 9 हजार 431 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर, 267 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. याचबरोबर राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 3 लाख 75 हजार 799 वर पोहोचली आहे.
आज (सोमवारी) महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'आयसीएमआर'च्या अत्याधुनिक चाचणी केंद्रांचे उद्धाटन करण्यात येणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी या केंद्रांचे उद्धाटन करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची देखील उपस्थित असणार आहे.
हेही वाचा -राज्यात ९ हजार ४३१ नव्या कोरोनाग्रस्तांची नोेंद; २६७ मृत्यू, तर ६ हजार रुग्णांना डिस्चार्ज..
राजस्थान
- जयपूर - राज्यातील राजकारणाचे डावपेच सुरूच आहेत. यातच भाजप प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रविवारी राज्यात आठ 611 नव्या रुग्णांची, तर आठ नव्या मृत्यूंची नोंद झाली. यानंतर, राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 35 हजार 909 वर, तर मृतांची संख्या 621 वर पोहोचली आहे.
दरम्यान, जोधपूरच्या विभागीय आयुक्तांना एआयआयएमएसमध्ये दाखल करण्यात आले आहे. गहलोत सरकारने रामगंज मॉडेलला जोधपूरमध्ये अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कोटा सेंट्रल जेलमध्ये आज २३ नव्या रुग्णांची नोंद झाली.
बिहार
- पाटणा - राज्यात आतापर्यंत 36 हजार 314 रुग्णांची नोंद झाली असून, 230 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, 24 हजार 520 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट हा देशापेक्षाही चार टक्क्यांनी पुढे असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमारांनी राज्यातील कोरोना चाचण्या वाढवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने स्पेशल फॅमिली पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत कोरोनाशी लढताना एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबीयांना नोकरी आणि इतर मदत देण्यात येणार आहे.
मध्य प्रदेश
- भोपाळ - आजपासून काटनी आणि छत्रपूर या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आपली प्रकृती स्थिर असल्याचे सांगत, कोरोना योध्यांच्या कामाला सलाम ठोकला आहे. शनिवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
दिल्ली
- नवी दिल्ली - दिल्लीतील कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर रविवारी 88 टक्क्यांवर पोहोचला. यानंतर अॅक्टिव रुग्णांच्या आकडेवारीत सर्व राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली आता 10 व्या क्रमांकावर पोहोचले आहे. तसेच गेल्या 24 तासांमध्ये 1 हजार 807 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृतीही सुधारत आहे.
उत्तराखंड
- रांची - आज झालेल्या 143 नव्या रुग्णांच्या नोंदीसह, उत्तराखंडमधील कोरोना रुग्णांची संख्या 6 हजार 104 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यातील 3 हजार 604 कोरोना रुग्णांवरील उपचार यशस्वी झाले आहेत. तर अॅक्टिव रुग्णांची संख्या 2 हजार 437 आहे.