महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

चिंताजनक : एकदिवसीय उच्चांकासह देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 11 लाखाच्या पार

सोमवारी देशात ४० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात नोंद झालेल्या रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ११,१८,०४३ वर पोहोचली आहे.

india corona news
कोरोना अपडेट भारत

By

Published : Jul 21, 2020, 2:41 AM IST

हैदराबाद - देशात लोकसंख्येची घनता जास्त असलेल्या परिसरामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. सोमवारी देशात ४० हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात नोंद झालेल्या रुग्णांची ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ११,१८,०४३ वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील अ‌ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ३,९०,४५९ आहे. तर आतापर्यंत २७,४९७ रुग्णांचा बळी गेला आहे. आतापर्यंत यातून बरे झालेल्यांची संख्या ७,००,०८६ आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 11,18,043..

कोरोनासंबंधी राज्यनिहाय ठळक घडामोडी..

दिल्ली..

नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सोमवारपासून पुन्हा कार्यालयात कामकाजास सुरूवात केली. १७ जूनला त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून यशस्वी उपचार करण्यात आले.

उत्तर प्रदेश..

लखनऊ : उत्तर प्रदेश सरकारने कोरोनाच्या लक्षणे न दिसणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी काही अटी लागू करण्यात आल्या आहेत. गृह-विलगीकरणासाठीच्या नियम व अटी लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. रुग्णालयांमध्ये असलेल्या खाटांच्या कमतरतेमुळेही हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

सोमवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. लक्षणे न दिसणारे अनेक रुग्ण आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे लपवत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. म्हणूनच अशा रुग्णांवर घरीच उपचार करण्याची मुभा देण्यात आली आहे.

बिहार..

पाटणा : एका केंद्रीय त्रिसदस्यीय समितीने बिहारच्या आरोग्य विभागाला राज्यातील रुग्णालयांची क्षमता वाढवण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राने आरटी-पीसीआर चाचण्यांना मान्यता दिल्यानंतर, राज्य सरकारने कोरोनाची लक्षणे दाखवणाऱ्या रुग्णांच्या मागणीनुसार त्यांची चाचणी करण्यास परवानगी दिली आहे.

हेही वाचा -राज्यात ८२४० नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १७६ मृत्यू

मध्य प्रदेश..

भोपाळ : मध्य प्रदेश काँग्रेस नेते प्रेमचंद बोरासी यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. सोमवारी त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बॉम्बे रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी त्यांचा कोरोना अहवाल मिळाला. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्याही संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच एकच खळबळ उडाली आहे.

ओडिशा..

भुवनेश्वर : कोरोना मृतदेहांच्या हाताळणीसाठी ओडिशा सरकारने निधी जाहीर केला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका मृतदेहाच्या हाताळणीसाठी ७,५०० रुपये निधी देण्यात येणार आहे.

कोरोना मृतदेहांची हेळसांड होऊ नये आणि त्यांच्यावर योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठीचा निधी हा मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीमधून वापरण्यात येणार आहे.

राजस्थान..

जयपूर : सोमवारी जैतारान उपविभागीय कार्यालयात १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर कार्यालय सील करण्यात आले आहे. २३ जुलैपर्यंत हे कार्यालय बंद राहणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details