महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर..

दोन लाख रुग्णांचा टप्पा ओलांडल्यानंतर केवळ दहा दिवसांमध्येच देशाने तीन लाख कोरोना रुग्णांचा टप्पा गाठला आहे. शनिवारी देशात एका दिवसातील सर्वाधिक म्हणजेच, ११,४५८ रुग्ण आढळून आले, तर ३८६ मृत्यूंची नोंद झाली. देशात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ८,८८४ लोकांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर पाहूया वेगवेगळ्या राज्यांमधील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...

COVID-19 news from across the nation
देशभरातील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर..

By

Published : Jun 14, 2020, 5:57 AM IST

हैदराबाद :दोन लाख रुग्णांचा टप्पा ओलांडल्यानंतर केवळ दहा दिवसांमध्येच देशाने तीन लाख कोरोना रुग्णांचा टप्पा गाठला आहे. शनिवारी देशात एका दिवसातील सर्वाधिक म्हणजेच, ११,४५८ रुग्ण आढळून आले, तर ३८६ मृत्यूंची नोंद झाली. देशात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ८,८८४ लोकांचा बळी गेला आहे. या पार्श्वभूमीवर पाहूया वेगवेगळ्या राज्यांमधील कोरोनासंबंधी महत्त्वाच्या घडामोडी...

देशातील कोरोना रुग्ण संख्या...
  • महाराष्ट्र -

राज्य सरकारने खासगी प्रयोगशाळांमध्ये होणाऱ्या कोरोना चाचणीचे दर ४,५०० वरून कमी करत २,२०० रुपयांवर आणले आहेत. खासगी प्रयोगशाळा यापेक्षा अधिक दर आकारू शकणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. यासोबतच, जिल्हाधिकारी आपापल्या जिल्ह्यांमधील प्रयोगशाळांशी चर्चा करून हे दर आणखी कमी करण्याबाबत प्रयत्न करु शकतात, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

सध्या राज्यात कोरोना चाचणी करणाऱ्या ९१ प्रयोगशाळा आहेत. तर, आणखी चार-पाच प्रयोगशाळांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणी मोफत होत आहे.

दरम्यान, ९१४ अ‌ॅक्टिव रुग्ण असलेला अकोला जिल्हा हा देशातील कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला जिल्हा ठरला आहे. जिल्ह्यामधील मृत्यूदर हा ४.७ टक्के आहे. राज्याच्या मृत्यूदरापेक्षा (३.६ टक्के) हा अधिक आहे. मात्र, देशाचा एकूण मृत्यूदर हा या दोन्हीपेक्षा बराच कमी (२.८१ टक्के) आहे. अकोल्यात आतापर्यंत कोरोनामुळे ४६ लोकांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात शनिवारी चार पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनाचा बळी ठरलेल्या पोलिसांची संख्या ही ४०वर पोहोचली आहे. तर सध्या १,३८२ पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

या सर्वात एक सकारात्मक घटना म्हणजे, पुण्यातील एका १२ दिवसांच्या बाळाने आणि त्याच्या आईने शनिवारी कोरोनावर मात केली. या दोघांनाही डिस्चार्ज देण्यात आला आहे.

  • नवी दिल्ली -

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन हे दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर अनील बजाज आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत रविवारी एक बैठक घेणार आहेत. या बैठकीला राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारीही उपस्थित असतील. देशाच्या राजधानीमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे.

  • गुजरात -

आठ विविध हिरे फर्ममध्ये एकूण २३ कोरोनाबाधित आढळल्यानंतर, प्रशासनाने अशा प्रकारच्या सर्व फर्म्सचे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १४ दिवसांच्या विलगीकरणात जाणे अनिवार्य करण्यात आले आहे..

दरम्यान, सोला उच्च न्यायालय पोलीस ठाणे हे आपल्या कोरोना प्रतिबंध उपायांसाठी प्रसिद्ध झाले आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या एकाही कर्मचाऱ्याला वा अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झालेली नाही.

  • झारखंड -

गिरिदिह जिल्ह्यातील माहूरीमध्ये एका स्थलांतरीत कामगाराला डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिसरातील कोरोना प्रसाराबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

या व्यक्तीवर रांचीमधील आरआयएमएसमध्ये उपचार सुरू होते. २१ मे रोजी त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले होते. त्यानंतर तो १४ दिवस विलगीकरणात राहिला होता, त्यानंतर पुन्हा चाचणी केल्यानंतर मात्र त्याचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुढील १३ दिवसांसाठी हे गाव लॉक करण्यात आले आहे.

  • पंजाब -

राज्यात एका सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सुखदियाल सिंग (५५) असे या अधिकाऱ्याचे नाव होते. अमृतसरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. टार्न तरण या जिल्ह्यातील ते रहिवासी होते, जिथे आतापर्यंत १७७ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

  • मध्य प्रदेश -

काँग्रेस आमदार कुणाल चौधरी यांचा कोरोना अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. राज्यात आतापर्यंत दहा हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर ४४० लोकांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • उत्तराखंड -

केरळ आणि ओडिशानंतर महामारी रोग (सुधारणा) अध्यादेश, २०२० लागू करणारे उत्तराखंड हे तिसरे राज्य ठरले आहे.

या कायद्यांतर्गत, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाऱ्या निर्बंधांचे (विलगीकरण, मास्क इत्यादी) उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त सहा महिन्यांपर्यंत कैद, आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा होऊ शकते.

  • बिहार -

शनिवारी राज्यात कोरोनाचे ८७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ६,१८३वर पोहोचली आहे.

या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था या पुढील सूचना देईपर्यंत बंद राहणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे शिक्षण मंत्री कृष्णानंदन वर्मा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :मुंबईत 1,383 नवे कोरोनाग्रस्त, रुग्णसंख्या दुपटीचा वेग मंदावला

ABOUT THE AUTHOR

...view details