महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

COVID-19 LIVE : राज्यात आढळला नवा रुग्ण, एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३२ वर..

COVID-19 Live Updates
COVID-19 Live Updates

By

Published : Mar 15, 2020, 7:56 AM IST

Updated : Mar 15, 2020, 1:06 PM IST

13:01 March 15

तामिळनाडूमध्ये पाचवीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर..

चेन्नई -तामिळनाडूमधील पाचव्या इयत्तेपर्यंतच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. ३१ डिसेंबरपर्यंत या शाळांना सुट्टी असणार आहे.

12:59 March 15

मुंबई - प्रत्येकालाच वाटते की, आपल्या मुला-मुलींचे लग्न मोठे व्हावे. पण सध्याची परिस्थिती पाहता लग्न अगदी साध्या पद्धतीने करावे. वर आणि वधुकडच्या अगदी थोड्या लोकांनी एकत्र येत घरगुती पद्धतीने लग्न करावे, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

वाचा :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती पद्धतीने लग्न करावं - अजित पवार

12:32 March 15

पुणे - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा, महाविद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्‍याचे आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर आणि जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. याच पाश्वभूमीवर पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व उद्याने आणि राजीव गांधी प्राणिसंग्रहालय पूर्ण वेळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासह इतर उद्याने बंद

12:02 March 15

औरंगाबादमध्ये आढळला नवा रुग्ण, महाराष्ट्रातील एकूण संख्या ३२ वर..

औरंगाबाद -महाराष्ट्रात कोरोनाचा नवा रुग्ण आढळून आला आहे. औरंगाबादमध्ये एका ५९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील कोरोग्रस्तांची संख्या आता ३२ वर पोहोचली आहे.

11:39 March 15

कोलकाता - बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) शनिवारी कोरोना व्हायरसविरुद्ध खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सामने ३१ मार्चपर्यंत स्थगित केले आहेत. सीएबीने स्पर्धा समिती आणि टेक्निकल समितीची आपत्कालीन बैठक आयोजित केली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.

वाचा :बंगाल क्रिकेट असोसिएशनकडून सर्व सामने 'या' तारखेपर्यंत स्थगित

11:38 March 15

नवी दिल्ली- वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने (सीडब्ल्यूआय) कोरोनाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व स्पर्धा पुढील ३० दिवसांपर्यत स्थगित केल्या आहेत. आपल्या वैद्यकीय सल्लागार समितीच्या (एमएसी) शिफारशीनुसार विंडीज क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. ही स्थगिती १६ मार्चपासून सुरू होईल.

वाचा :कोरोनाचा कहर!..विंडीजकडून सर्व स्पर्धांना स्थगिती

11:38 March 15

लंडन- कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) सर्व स्पर्धा २० एप्रिलपर्यंत पुढे ढकलल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर आयटीएफने वैद्यकीय कर्मचारी, वाहतूक आणि सुरक्षा तज्ञांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. शिवाय, त्यांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय संस्थांशी चर्चा केली.

वाचा :आयटीएफकडून सर्व स्पर्धा २० एप्रिलपर्यंत स्थगित

11:37 March 15

नवी दिल्ली - देशभरात फोफावत चाललेल्या कोरोना व्हायरसमुळे आय-लीग सामन्यांसह इतर सर्व फुटबॉल स्पर्धा  पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कुटुंब आणि कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाचा :कोरोनाची फुटबॉलला 'किक', आय-लीगसह देशातील सर्व स्पर्धा स्थगित

11:15 March 15

आंध्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ढकलल्या पुढे..

अमरावती -कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याचे निवडणूक आयुक्त एन. रमेश कुमार यांनी ही माहिती दिली. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यानंतर निवडणुकांच्या तारखा जाहीर करणार असल्याचेही ते म्हटले.

10:34 March 15

मुंबई- राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31 मार्च पर्यत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात परीक्षा सुरू राहतील. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरू राहतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी विधानसभेत दिली.

वाचा :CORONA VIRUS : शहरांमधील सर्व शाळा, महाविद्यालये, मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद

10:26 March 15

कर्नाटकातील सातवी, आठवी अन् नववीच्या परीक्षा ढकलल्या पुढे..

बंगळुरू- कोरोनाच्या दहशतीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून, कर्नाटकातील सातवी, आठवी आणि नववीच्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याचे शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

10:22 March 15

मिलानमधील २१८ भारतीय मायदेशी परतले..

नवी दिल्ली- मिलानमध्ये अडकलेले २१८ भारतीय मायदेशी परतले आहेत, अशी माहिती परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी दिली. हे नागरिक दिल्लीमध्ये उतरले. यांमध्ये २११ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच, परदेशात अडकलेल्या सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी सरकार बांधील असल्याचेही ते म्हटले.

09:09 March 15

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'करतारपूर साहिब गुरुद्वारा' बंद..

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून 'करतारपूर साहिब गुरुद्वारा'ची तिकीटविक्री बंद करण्यात आली आहे. तसेच, भाविकांना याठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे. १६ मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.

08:06 March 15

इराणमध्ये अडकलेले २३४ भारतीय मायदेशी परतले..

नवी दिल्ली - इराणमध्ये अडकलेले २३४ भारतीय मायदेशी परतले आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी ही माहिती दिली.

यांमध्ये १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविकांचा समावेश होता. 'इराणमध्ये अडकलेले २३४ भारतीय हे मायदेशी परतले आहेत. इराणमधील भारतीय राजदूत धामू गड्डाम यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे धन्यवाद. तसेच, इराणी अधिकाऱ्यांचेही धन्यवाद.' असे ट्विट करत जयशंकर यांनी ही माहिती दिली.

07:49 March 15

स्पेनच्या पंतप्रधानांची पत्नी 'कोरोना पॉझिटिव्ह'..

मद्रिद - स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सँचेझ यांची पत्नी बेगोना गोमेझ यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयातून ही माहिती देण्यात आली. या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

07:49 March 15

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. चीनमधील कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत असला, तरी मध्य-पूर्व आशिया, युरोप आणि अमेरिकेतही याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसून येत आहे. जगभरात कालपर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांना याची लागण झाली असून, सुमारे सहा हजार लोकांचा यात बळी गेला आहे. तसेच, सुमारे ७६ हजार लोक यातून बरेही झाले आहेत.

भारतात आतापर्यंत सुमारे १०० जणांना याची लागण झाली असून, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दहाहून अधिक लोक यातून बरे झाले आहेत. बाकी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Last Updated : Mar 15, 2020, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details