पणजी (गोवा)- आज गोव्याच्या दाबोळी विमानतळावर कोरोणा संसर्ग झालेला संशयित प्रवाशी आढळून आला आहे. त्याच्या रक्ताचे नमुने पुण्यातील नँशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठविण्यात आले आहे. त्याच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या विषाणूचा सामना करण्यासाठी गोवा सरकारने कृती दलाची स्थापना केली आहे.
गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे, याचा प्रतिबंध करण्यासाठी गोवा सरकारने कृतीदलाची स्थापना केली आहे. ज्यामध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य संचालनालय खासगी रुग्णालय आदींचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर आज संध्याकाळी कृती दलाची उच्च पातळीवरील बैठक पार पडली. यामध्ये गोव्याचे आरोग्य सचिव संजयकुमार, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालनालयाचे डॉ. जोश डिसा, डॉ. उत्कर्ष बेतोडेकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.
यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना संजयकुमार म्हणाले, कोरोणा विषाणूचा सामना करण्यासाठी गोव्याची आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. देशात या संदर्भातील संशयितांचे सर्व नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहेत. परंतु, एकही नमुना सकारात्मक आलेला नाही. हा विषाणू चीनमधून जगभर पसरला असल्याने केंद्र सरकारने थेट चीनमधून येणाऱ्या विमानांमधील प्रवाशांची तपासणी करण्यासाठी काही विमानतळावर 'थर्मल स्कॅनिंग' ची सुविधा उपलब्ध केली आहे. गोवा सरकारनेही नागरी उड्डाण खात्याकडे गोव्यातही अशी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आज गोव्यात कोरोणा व्हायरसग्रस्त संशयित प्रवाशी आढळून आला आहे. त्याच्यावर गोमेकॉमध्ये उपचार सुरू आहे. त्याचा रक्ताचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहेत. तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे.