नवी दिल्ली - अवघ्या काही दिवसांवर आलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी चक्क बिहारमधील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर बिहारसह देशातील राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणावरून शिवसेना, काँग्रेससह इतर पक्षांनीही भाजपावर टीका केली आहे. केंद्रात सत्ता आहे म्हटल्यावर देशातील प्रत्येक राज्य आणि प्रत्येक नागरिक हा भाजपासाठी समान असायला पाहिजे. मात्र, एकाच राज्यातील लोकांवर जास्त उदार होणे, हे केवळ निवडणुकीपुरते आहे का? असा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा -बिहार विधानसभा : लोकजनशक्ती पक्षाकडून रोजगार देण्याचे आश्वासन
मोफत कोरोना लस हा भाजपाचा 'चुनावी जुमला' - शिवसेनेचा चिमटा
भाजपाच्या या घोषणेमुळे विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र्रात सत्तेत असलेल्या व भाजपाचा कट्टर विरोधक बनलेल्या शिवसेनेनेही भाजपावर टीका केली आहे. लस अजून आली नाही. परंतु ही लस आता चुनावी जुमला बनली आहे. देशातील सर्व राज्यातील नागरिकांची जबादारी केंद्र सरकारची नाही का? असा प्रश्न शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार व प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला आहे. देशातील सर्व राज्यातील नागरिकांची जबाबदारी एकसमान असली पाहिजे असेही चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.
बिहारमधील नागरिकांना कोरोनाची लस मोफत देण्याचे आश्वासन खोटे - राहुल गांधी
भाजपाच्या कोरोना लसीच्या आश्वासनावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, कोरोनाविरोधात मोदी सरकारने रणनिती जाहीर केली आहे. राज्यानुसार निवडणुकांच्या तारखांचा तपशील पहा आणि त्यानंतर कोरोनाची लस कधी उपलब्ध होईल ते सांगा. तसेच हे दिलेले आश्वासन खोटे असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
कोरोनाची लस भाजपची नसून, प्रत्येत भारतीय नागरिकाची आहे - तेजस्वी यादव
बिहारमधील महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांनीदेखील भाजपाच्या या आश्वासनावर टीका केली आहे. ते म्हणाले की, कोरोनाची लस ही भारतातील प्रत्येक नागरिकासाठी असून, ती फक्त भाजपाचीच नाही. त्यामुळे भाजपाने खोटे कांगावे करून मतदारांना खोटे आश्वासन देऊ नये.
काय आहे जाहीरनाम्यात -
देशभरात कोरोनाचा प्रसार झाला असतानाही बिहार विधासनभेची निवडणूका होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी बिहारमधील नागरिकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते आज भाजपाचा हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला. यावेळी त्या म्हणाल्या, एनडीए सरकार यशस्वीपणे कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनाच्या अनेक लसींच्या विविध स्तरांवर चाचण्या सुरू आहेत. आयसीएमआर ज्या कोरोना लसीला परवानगी देईल, ती लस बिहारच्या प्रत्येक नागरिकाला मोफत देण्यात येईल. कोरोनाच्या लसीला परवानगी मिळाल्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात तिचे उत्पादन घेण्यात येईल. बिहारच्या प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत मिळणार असे भाजपाने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. मात्र, देशातील प्रत्येक नागरिकाला ही लस मोफत देणार का, याबाबत भाजपाने काहीही माहिती दिलेली नाही.
हेही वाचा -निवडणुकीसाठी भाजपचे 'कोरोनास्त्र'; बिहारमध्ये मोफत कोरोना लस वाटण्याचे आश्वासन
निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल
सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी भाजपाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. कोरोनाच्या लसीवर देशातील प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्यामुळे केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून, कोरोनाच्या मोफत लसीचे आश्वासन देणे हे चुकीचे असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.