पैगंबरावर सिनेमा बनवण्याची कुणाचीही हिंमत नाही; गिरीराज सिंहांचे वादग्रस्त वक्तव्य
मुस्लिमांविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल गिरीराज सिंह यांच्यावर आदर्श आचार संहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी बिहारच्या एका न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. यानंतर काही तासांतच केंद्रीय मंत्री सिंह यांनी हे भडकाऊ वक्तव्य केले.
नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी पुन्हा एकदा भडकाऊ वक्तव्य केले आहे. त्यांनी एका वादग्रस्त मल्ल्याळम चित्रपटाचा उल्लेख करत एखादी व्यक्ती 'सेक्सी दुर्गा' सारखा चित्रपट बनवू शकते. मात्र, कुणातही पैगंबर मोहम्मद किंवा फातेमा यांच्यावर चित्रपट बनवण्याची हिंमत नाही, असे सिंह यांनी म्हटले आहे.
यापूर्वी मुस्लिमांविरोधात वादग्रस्त टिप्पणी केल्याबद्दल आदर्श आचार संहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा सिंह यांच्यावर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी बिहारच्या एका न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. यानंतर काही तासांतच त्यांनी हे भडकाऊ वक्तव्य केले आहे.
दक्षिण दिल्लीतून भाजप उमेदवार रमेश बिधूडी यांच्या प्रचारासाठी एका सभेला संबोधित करताना सिंह यांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी केजरीवाल हे 'टुकडे-टुकडे गँग'चा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला. देशद्रोहाच्या प्रकरणात जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी विद्यार्थी नेते आणि भाकप उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर कारवाई करण्यात केजरीवाल सरकार अडथळा आणत आहे, असे त्यांनी म्हटले. दिल्लीत भाजपची सत्ता येईल, तेव्हाच परिस्थिती सुधारेल, असेही सिंह यांनी म्हटले आहे. ते बेगूसरायमधून भाकप उमेदवार कन्हैया कुमारच्या विरोधातील भाजप उमेदवार आहेत.