'कंटेनमेंट झोन' हे शब्द तुम्ही गेल्या काही दिवसांमध्ये वारंवार ऐकले असतील. कंटेनमेंट झोन म्हणजे शहराचा असा भाग, जिथे कोरोनाच्या विषाणूचा सर्वाधिक आणि झपाट्याने प्रसार झाला आहे, आणि पुढेही होण्याची शक्यता आहे. एखादा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित झाल्यास तिथे तातडीने निर्बंध लागू होतात. तातडीने तिथे रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) पाठवली जाते, आणि काही तासांमध्येच त्या परिसराला लष्करी छावणीचे स्वरुप येते.
देशात सध्या कोणत्या शहरांमध्ये कितीकंटेनमेंटझोन्स आहेत, ते पाहूया..
- दिल्ली- शहरामध्ये पाच मे पर्यंत ९० कंटेनमेंट झोन होते. दिल्लीमध्ये कोरोनाचे ५,१०४ रुग्ण आढळून आले आहेत.
- हैदराबाद - सहा मे ला राज्यसरकारने शहरातील कंटेनमेंट झोन्सची संख्या ३५ वरुन १२ वर आणली. शहरात सध्या ५९१ रुग्ण आहेत.
- मुंबई- शहरात २४ एप्रिलपर्यंत ७२१ कंटेनमेंट झोन्स तयार करण्यात आले होते. त्यानंतर त्यात फारसा बदल करण्यात आला नाही. शहरात सध्या कोरोनाचे ९,९४५ रुग्ण आढळून आले आहेत.
- चेन्नई- शहरात १८९ कंटेनमेंट झोन आहेत. तर, शहरातील एकूण रुग्णांची संख्या २,००७ आहे.
- कोलकाता- शहरात आतापर्यंत ५१६ कंटेनमेंट झोन्स घोषित करण्यात आले आहेत. कोलकात्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७०० आहे.
- बंगळुरू- शहराच्या ग्रामीण आणि शहरी भागात मिळून २५ कंटेनमेंट झोन्स तयार करण्यात आले आहेत. बंगळुरूमध्ये एकूण १६१ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
- पुणे- चार मेपर्यंतच्या आकडेवारीनुसार शहरात ६९ कंटेनमेंट झोन आहेत. तर आतापर्यंत एकूण २,०६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
- अहमदाबाद- शहरात कोरोनाचे ४,४२५ रुग्ण आहेत. तर आतापर्यंत शहरात दहा कंटेनमेंट झोन्स घोषित करण्यात आले आहेत.
- इंदूर- शहरात एकूण २०० कंटेनमेंट झोन्स आहेत. तर, आतापर्यंत शहरात १,६५४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
- भोपाळ- शहरात एकूण ११९ कंटेनमेंट झोन्स आहेत. तर, आतापर्यंत शहरात ५७१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.