भोपाळ - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कृषी कायदे हे योग्य असून त्याविरोधात आंदोलन करणारे हे शेतकरी नसून अफवा पसरवणारे दुसरे लोग आहेत. हे शेतकऱ्यांच्या वेषात काँग्रेस आणि वामपंथी लोक आहेत. या सर्वांना तुरुंगात डांबल पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलं.
शेतकरी आंदोलनात देशविरोधी लोक आहेत. कारण, जेव्हा शाहीन बाग चळवळ झाली. तेव्हा त्यात जेएनयूचे विद्यार्थी आणि डाव्या विचारसरणीच्या काही चित्रपट कलाकारांचा समावेश होता. तेच चेहरे आज पुन्हा समोर येत आहेत. त्यामुळे ते शेतकरी नव्हे तर डाव्या विचारसरणीचे आणि काँग्रेसवाले आहेत. हे लोक देशाला गोंधळात टाकत आहेत. अशा लोकांना लवकरच शिक्षा झाली पाहिजे आणि तुरुंगात टाकले पाहिजे, असे वादग्रस्त वक्तव्य प्रज्ञा यांनी केले.
पंजाबमध्ये काँग्रेसचे राज्य आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने कृषी कायद्याची अंमलबजावणी केली नाही आणि ते लोक आंदोलन करत आहेत. इतर राज्यातील लोक कायद्यांविरोधात निषेध करत नाहीत. हा कायदा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, त्यात कोणत्याही सुधारणाची गरज नाही, असे साध्वी प्रज्ञा म्हणाल्या.