इंदौर - काँग्रेस उत्तर प्रदेश पूर्वच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'ढगाळ वातावरण आणि रडार' यांवरील वक्तव्यानंतर त्यांना 'संरक्षण तज्ज्ञ' म्हणत टोला लगावला आहे. त्यांनी मध्य प्रदेशात इंदौर येथे झालेल्या 'रोड शो'मध्ये मोदींवर निशाणा साधला. मुख्यमंत्री कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही त्यांच्यासोबत होते.
'नरेंद्र मोदी हे खूप मोठे 'संरक्षण तज्ज्ञ' आहेत. त्यांनी कोण विमाने बनवू शकतो, हे स्वतःच ठरवले. ज्यांनी कधी जन्मात विमान बनवले नव्हते, ते विमान बनवू शकतात, हे मोदींनी ठरवले,' असे म्हणत प्रियांका यांनी मोदींच्या 'ढगाळ वातावरण आणि रडार' यावरील वक्तव्यानंतर त्यांचा समाचार घेतला. 'त्यांना वाटले, वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे आपली 'ही बाब' रडारवर येणार नाही. मात्र, ते (मोदी) रडारवर आलेच. जरी पाऊस पडत असला किंवा स्वच्छ उजेड असला तरी, प्रत्येकाला त्यांच्या राजकारणाचे सत्य ठाऊक आहे,' असा टोला प्रियांका यांनी राफेल प्रकरणावरून लगावला आहे.
'संरक्षणतज्ज्ञ' मोदींनी विमाने कोण बनवू शकतो हे स्वतःच ठरवले, प्रियांका गांधींचा टोला - pm modi
'त्यांना वाटले, वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे आपली 'ही बाब' रडारवर येणार नाही. मात्र, ते (मोदी) रडारवर आलेच. जरी पाऊस पडत असला किंवा स्वच्छ उजेड असला तरी, प्रत्येकाला त्यांच्या राजकारणाचे सत्य ठाऊक आहे,' असा टोला प्रियांका यांनी राफेल प्रकरणावरून लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमधील प्रश्नांची उत्तरे ट्विटरसहित इतर सोशल मीडिया साइट्सवर शेअर झाली आहेत. याच मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइकदरम्यान तज्ज्ञांना ढगाळ वातावरण असल्याने मोहीम रद्द करण्यात येऊ नये, असा सल्ला दिल्याचे सांगितले होते. 'हल्ल्याआधीच्या ढगाळ वातावरण आणि पावसामुळे हल्ल्याची तारीख बदलण्याच्या विचारात तज्ज्ञ होते, त्यावेळी भारतीय विमानांना रडारपासून वाचण्यासाठी, अशा वातावरणाचा फायदा होऊ शकतो, असा सल्ला मी दिला होता’, असे विधान मोदींनी केले होते. यावरून त्यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. आता प्रियांका गांधींनीही त्यांना चांगलाच टोला लगावला आहे.
'लहानपणापासून मी सत्ता खूप जवळून अनुभवली आहे. खूप मोठ-मोठे पंतप्रधान पाहिले आहेत. त्यामध्ये इंदिरा गांधींचाही समावेश आहे. तेव्हा एखादा राजकारणी ही सत्ता त्याचीच आहे, असा समज करून घेतो आणि लोकांना विसरतो, त्याच दिवसापासून त्याचे भविष्य आपोआप 'सील' होते,' असे प्रियांका यांनी म्हटले आहे. 'मागील ५ वर्षांत भाजप आणि भाजप सरकारने, त्यांच्या नेत्यांनी, पंतप्रधानांनी सत्तेविषयी चुकीचा ग्रह करून घेतला आहे. ही सत्ता आपल्याजवळच कशी राहील, यासाठी त्यांचे सर्व प्रयत्न चालू आहेत. त्यांनी लोकांना भेटणे बंद केले आहे. त्यांचा उद्धटपणा अतिशय वाढला आहे,' असेही प्रियांका म्हणाल्या.