नवी दिल्ली - ढासळत्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात १० दिवस काँग्रेस देशभरामध्ये भाजप सरकार विरोधात आंदोलने करणार आहे. आंदोलनाला विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळावा म्हणून ४ नोव्हेंबर रोजी काँग्रेसने विरोधी पक्षांची एक बैठक बोलावली आहे. मंदी बरोबरच बेरोजगारी, शेतीची दुरावस्था यावरूनही काँग्रेस पक्ष सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याची तयारी करत आहे.
देशाची अर्थव्यवस्था ढासळत असून त्याचा फटका उद्योग, व्यापार, बँका आणि गुंतवणुकीसह सर्वच क्षेत्रांमध्ये होत असल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक वेळा म्हटले आहे. सभांमधून आणि ट्विटरवरुन त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. तसेच अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीवर बोलण्याचे पंतप्रधान मोदींना आवाहन केले होते.
हेही वाचा -जर्मनी-भारतादरम्यान विविध क्षेत्रातील 11 सामंजस्य करारांवर सह्या
असे आहे देशातील अर्थव्यवस्थेचे चित्र-
एप्रिल-जूनमध्ये ५ टक्के झालेला जीडीपी हा गेल्या सहा वर्षातील सर्वात कमी जीडीपी आहे. चालू आर्थिक वर्षामधील एप्रिल-जूनच्या कालावधीत एकूण औद्योगिक उत्पादन दर ३ टक्के नोंदविण्यात आला आहे. तर गेल्या वर्षी एप्रिल-जूनदरम्यान ५.९ टक्के एकूण औद्योगिक उत्पादन दर होता. देशाचे एकूण औद्योगिक उत्पादन हे २.९ टक्क्यांनी घसरल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
देशाची अर्थव्यवस्था ही संकटामधून जात असताना भारतीय कंपन्यांवरील कर्जाचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. भारतीय कंपन्यांवरील विदेशी कर्जाचा बोजा गतवर्षीच्या तुलनेत जुलैमध्ये दुप्पट झाला आहे. हे प्रमाण ४.९८ अब्ज डॉलर एवढे झाल्याची माहिती आरबीआयच्या आकडेवारीतून दिसून आली आहे. देशातील उत्पादन क्षेत्राची कामगिरी ऑगस्टमध्ये आणखीनच घसरली आहे. गेल्या १५ महिन्यातील निर्मिती खरेदी व्यवस्थापक निर्देशांकाचा (पीएमआय) निचांक ऑगस्टमध्ये नोंदविण्यात आला आहे.
हेही वाचा -४ नोव्हेंबरला राज्यात नवीन राजकीय समीकरण? शरद पवार घेणार सोनिया गांधी यांची भेट
काँग्रेसने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची अर्थव्यवस्थेच्या गंभीर स्थितीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. यामध्ये त्यांनी देशात आलेल्या मंदीवरुन चिंता व्यक्त केली होती. देशाची अर्थव्यवस्था दिवसेंदिस ढासळत असून जीडीपीही दरवर्षी कमी होत आहे. त्यामुळे २०२२ पर्यंत ५ ट्रिलियन इकॉनॉमी शक्य नसल्याचे मत त्यांनी मांडले.
गाजावाजा करत सुटलेले भाजपचे 'डबल इंजिन' हे निव्वळ अपयशी ठरले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या खूप वाईट स्थितीमध्ये आहे. महाराष्ट्रातील उत्पादन वाढीचा दर हा गेली चार वर्षे घसरत चालला आहे, असे मत सिंग यांनी म्हटले. देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची होण्यासाठी सरकारने चांगली रणनिती आखावी, असे सिंग म्हणाले होते.