जयपूर -उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये तरुणीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेलेल्या राहुल गांधींना धक्काबुक्की झाल्यानंतर काँग्रेसकडून उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्यात आली. हाथरसमध्ये लपवण्यासारखे काही नाही, तर मग विरोधीपक्षांना पीडित कुटुंबाची भेट घेण्यापासून का रोखण्यात येत आहे, असा सवाल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला.
'हाथरसमध्ये लपवण्यासारखे काहीच नाही, तर मग विरोधीपक्षांना का रोखलं'
काँग्रेसकडून योगी आदित्यानाथ यांच्यावर टीका करण्यात आली. हाथरसमध्ये लपवण्यासारखे काही नाही, तर मग विरोधीपक्षांना पीडित कुटुंबाची भेट घेण्यापासून का रोखण्यात येत आहे, असा सवाल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला.
उत्तर प्रदेश पोलिसांनी ज्या प्रकारचे वर्तन राहुल गांधींसोबत केले, ते निंदनीय आहे. पीडित लोकांची भेट घेणं, अन्यायावर आवाज उठवणं, हा विरोधी पक्षाचा धर्म आहे. विरोधी पक्षाचे प्रमुख असल्याच्या नात्याने राहुल गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले. मात्र, त्यांना रोखण्यात आले. त्यांच्यासोबत दुर्व्यवहार करण्यात आला, असे ते म्हणाले.
उत्तर प्रदेश प्रशासनाने पीडित तरुणीवर रात्री अत्यंसस्कार केले. एखादा सैनिक हुतात्मा झाल्यानंतर त्यांच्या घरच्यांना त्यांचा देह सोपवला जातो. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी पीडितेच्या आईलाही तिचा चेहरा पाहू दिला नाही. राजस्थानच्या डुंगरपुरमध्येही एक घटना घडली. तेथील पीडित कुटुंबाची भेट घेण्यापासून आम्ही विरोधी पक्षांना थांबवले नाही, असेही गेहलोत म्हणाले.