नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊन दरम्यान गरीब आणि स्थलांतरित मजुरांना भेडसावणार्या आर्थिक समस्यांकडे लक्ष देण्यासाठी काँग्रेसने गुरुवारी 'स्पीक अप इंडिया' ही ऑनलाइन मोहीम सुरू केली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी 'स्पीक अप इंडिया' मोहिमेचे स्वागत केले आहे. या मोहिमेमुळे कामगारांचा आवाज बुंलद होईल, असे गहलोत म्हणाले.
'कामगारांचा आवाज बुलंद करण्यासाठी 'स्पीक अप इंडिया' मोहीम' अशोक गहलोत यांनी एक व्हीडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अचानक जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगारांचे मोठे नुकसान झाले आहे. कामगारांच्या वेदना शब्दातही व्यक्त केल्या जाऊ शकत नाहीत.
घरी पोहचण्यासाठी कामगार पायी चालत आहेत. गर्भवती महिलांची रस्त्यांमध्ये प्रसुती होत आहे. अपघाताने आणि भुकेल्या-तहानलेल्या अवस्थेत चालल्यामुळे कामगारांचा मृत्यू होत आहे. तसेच रेल्वे रस्ता भरकटण्याच्या घटनाही पहिल्यांदाच घडत आहेत. याबाबत केंद्र सरकार असंवेदनशील आहे, असे गहलोत म्हणाले.
देशातील वातावरणामुळे लोक चिंताग्रस्त झाले असून ही खेदाची बाब आहे. पंतप्रधानांनी थाळ्या आणि टाळ्या वाजवल्या, लोकांनी त्याला पाठिंबा दर्शविला. मात्र, देशात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बिघडली आहे. कोरोनाविरोधात राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पुढे येऊन राज्यांची मागणी न करता राज्यांना आर्थिक पॅकेज दिले पाहिजे, असे गहलोत म्हणाले.