पाटणा - बिहार विधानसभा निवडणूक जवळ येत असून राजकीय नेते तुफान फटकेबाजी करत आहेत. एनडीए आणि महागठबंधनने नागरिकांना निवडणूक जाहीरनाम्यातून विविध प्रलोभने दाखविली आहेत. दरम्यान, लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर टीका केली आहे. या निवडणुकीत पंतप्रधान मोदींचे आशीर्वाद घेवून साहेब (नितीश कुमार) लालू प्रसाद यादव यांच्या चरणी न जावो, असा खोचक टोला चिराग पासवान यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
चिराग पासवान यांनी ट्विट करून मुख्यमंत्री नितीश कुमारांना लक्ष्य केले. मागील बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडी आणि जेडीयू एकत्र लढले. मात्र, त्यानंतर नितीश कुमारांनी आघाडीतून बाहेर पडत भाजपाचा पाठिंबा घेतला. त्यावरून चिराग पासवान यांनी टीका केली. 'मागील निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या आशीर्वादाने नितीश कुमार मुख्यमंत्री बनले आणि त्यांना धोका देऊन पंतप्रधानांच्या आशीर्वादाने रात्रीत पुन्हा मुख्यमंत्री बनले. यावेळी मोदींचे आशीर्वाद घेऊन ते लालू प्रसाद यादव यांच्या चरणी न जावो, असे ट्विट चिराग पासवान यांनी केले आहे.