पाटणा - बिहारमध्ये विधानसभा निवडणूक सुरू आहे. यातच नेत्यांकडून एकमेंकावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एनडीएतून बाहेर पडून स्वबळावर यावेळी लोक जनशक्ती पक्ष मैदानात आहे. लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख चिराग पासवान प्रचारादरम्यान सातत्याने मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर हल्लाबोल करताना दिसून येत आहेत. आज त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. नितिश कुमार हे अत्यंत लोभी असून सत्तेत येण्यासाठी ते काहीही करू शकतात. बिहारने आजपर्यंत पाहिलेले सर्वांत भ्रष्ट मुख्यमंत्री आहेत, असे चिराग पासवान म्हणाले.
नितीश कुमार सर्वात लोभी व्यक्ती आहे. सत्तेत राहण्यासाठी ते काहीही करू शकतात. राजकीय सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर हात जोडून उभे असतात. तसेच आपली खुर्ची वाचवण्यासाठी लालूजी किंवा तेजस्वी यादव यांना भेटण्यासाठी ते रांचीलाही जाऊ शकतात, असे चिराग पासवान म्हणाले.
भाजप आणि लोकजनशक्तीचे राज्यात सरकार -
भाजपा आणि लोक जनशक्ती मिळून राज्यात सत्ता स्थापन करू. यावर माझा पूर्ण विश्वास आहे. नितिश कुमार यांच्या सत्ताकाळात बिहारची परिस्थिती बिघडत गेली आहे. त्यांनी गेल्या 5 वर्षांत काय विकास केला. याबद्दल मी त्यांना सतत विचारत आलो आहे. मात्र, उत्तर देण्याऐवजी ते माझ्यावर व्यक्तीगत हल्ला करतात, असेही चिराग म्हणाले.