हैदराबाद -चीनची अर्थव्यवस्था ढासळलेली असून त्यांना युद्ध परवडणारे नाही, असे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ कमर आघा यांनी व्यक्त केले आहे. चीनची अर्थव्यवस्था व्यापारावर अवलंबून असून कोरोना विषाणूच्या प्रसारानंतर निर्यात कमी झाली असल्याचे आघा म्हणाले.
कमर आगा यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेसंबधी ईटीव्ही भारतशी खास चर्चा केली. ‘चीनची अर्थव्यवस्था निर्यातीवर अवलंबून असून मागील काही दिवसांपासून निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे चीनवर आर्थिक संकट येण्याची चिन्हे दिसत आहेत. चीन भारताला व्यापारातील प्रतिस्पर्धी म्हणून पाहतो. कोरोनामुळे विविध अमेरिकन आणि युरोपीयन कंपन्या आपले उत्पादन भारतात हलविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारत भविष्यात उत्पादन केंद्र बनेल याची चीनला भीती वाटत आहे’, असे आघा म्हणाले.