नवी दिल्ली - चीन भारतासोबत झालेल्या द्विपक्षीय करार आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन करीत आहे, याचा भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने पुनरुच्चार केला. बीजिंगची ही कृती दोन आशियाई दिग्गजांच्या सीमेवर शांतता व स्थिरता कायम करण्यासाठी उभय देशांमधील झालेल्या कराराचे उल्लंघन करत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे पूर्व लडाखमधील पॅन्गाँग त्सो सरोवरात भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा नव्याने प्रयत्न केला. चीनची धुसखोरी रोखण्याविषयीच्या भारतीय सैन्याच्या मोहिमेसंदर्भात सैन्याने केलेल्या वक्तव्यावर चीनने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. याला चोख प्रत्युत्तर देताना भारतानेही चीन उभय देशांमधील झालेल्या कराराचे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे. 29-30 ऑगस्टच्या रात्री उशिरा चीनने 'पॅन्गाँग' सरोवराच्या दक्षिण काळावरून घुसखोरीचा प्रयत्न करत भारताला चिथावणी दिली, असे मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी एका निवेदनात म्हटले.
'काल भारतीय लष्कराने सांगितल्याप्रमाणे, लष्कराने या चिथावणीखोर कृतींना चोख उत्तर दिले आणि आमच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी एलएसीवरती योग्य बचावात्मक उपाय केले,' असे श्रीवास्तव म्हणाले.
'याशिवाय, 31 ऑगस्टलाही दोन्ही बाजूंच्या सैन्यांचे ग्राउंड कमांडर परिस्थिती आणखी बिघडण्यापासून रोखवण्यासाठी चर्चा करीत असताना चिनी सैन्याने पुन्हा चिथावणीखोर घुसखोरी केली. वेळेवर बचावात्मक कारवाई केल्यामुळे भारतीय पक्ष परिस्थितीत एकतर्फी बदल करण्याच्या या उपद्व्यापांना रोखू शकला. '
भारतच चिथावणी देतोय - चिनी दूतावास
'भारतीय सैनिकांनी मागील बहु-स्तरीय चर्चा आणि त्यानंतर चीन आणि भारतादरम्यान समझोता झाल्यानंतर पॅन्गाँग त्सो सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर आणि चीन-भारत सीमेच्या पश्चिम क्षेत्रात अवैधपणे वास्तविक नियंत्रण रेषेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. भारत अशा कारवाया करून चीनला खुलेआम चिथावणी देत आहे. यामुळे सीमावर्ती भागात पुन्हा तणाव वाढला आहे,' असे नवी दिल्ली स्थित चिनी दूतावासाचे प्रवक्ते जी रोंग यांनी म्हटले होते. यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानेही या वक्तव्याला जोरदार उत्तर देताना वरील वक्तव्य केले.
भारताच्या या पावलामुळे चीनच्या क्षेत्रीय सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाले आहे. भारताकडून दोन्ही देशांदरम्यानचे समझोते, प्रोटोकॉल आणि महत्त्वपूर्ण सहमती-कराराचे गंभीर उल्लंघन झाले आहे. सोबतच चीन-भारत सीमा क्षेत्रात शांततेला गंभीर
धोका पोहोचला आहे. हे रोखण्यासाठी दोन्ही बाजूंकडून होणारे प्रयत्न एकदम उलट आहेत. भारताकडून ही सर्व स्थिती शांत करण्याच्या अगदी उलट दिशेने पावले उचलली जात आहेत. याचा चीन विरोध करत आहे.
भारतीय सैन्याने सोमवारी जारी केलेल्या वक्तव्यात - 'पीएलएच्या सैनिकांनी पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या कारावाईदरम्यान सैन्य और राजनैतिक स्तरावरील मागील काही दिवसांतील चर्चेत झालेल्या सर्वसहमतीचे उल्लंघन केले आहे. तसेच, चिथावणीखोर कारवाया केल्या आहेत,' असे म्हटले होते.
क्षेत्रीय अखंडत्वाचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध
'भारतीय सैनिकांनी पॅन्गाँग त्सो तलावावर पीएलए कारवाया रोखून आधीची स्थिती स्थापन केली. येथील परिस्थिती एकतर्फीरीत्या चीनच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडला. भारतीय सैन्य येथे चर्चेच्या माध्यमातून शांती स्थापित करण्यासाठी कटिबद्ध आहे. मात्र, त्याच वेळी भारताचे क्षेत्रीय अखंडत्व अबाधित राखणे हेही त्यांचे ध्येय आहे,' असे भारतीय लष्कराद्वारे जारी केलेल्या एका वक्तव्यात म्हटले होते.