पुलवामा हल्ला : पाकच्या समर्थनात चीन; यूएनएससीच्या निषेधावर प्रतिक्रिया - Jais e mohammad
यूएनएससीने या हल्ल्याची निंदा केल्यानंतर चीन खळबळून जागा झाला आहे. यूएनएससीने नोंदवलेल्या निषेधामध्ये जैश-ए-मोहम्मदचे नाव सामान्य पद्धतीने वापरण्यात आले, असे चीनने नोंदवले आहे. त्यामुळे यूएनएससी जैश-ए-मोहम्मदचा विरोध करतो, असे म्हणता येत नाही. अशा आशयाची प्रतिक्रिया चीनने नोंदवली आहे.
नवी दिल्ली -संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) गुरुवारी पुलवामा दहशतवादी हल्ल्याची निंदा केली होती. त्यावेळी परिषदेने जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचेही नाव घेतले होते. मात्र, चीनने या संदर्भाकडे दुर्लक्ष केले आहे. तर, चीनच्याच हस्तक्षेपामुळे यूएनएससीने पुलवामा हल्ल्यावर इतक्या उशिरा प्रतिक्रीया दिली, असे म्हटले जात आहे.
यूएनएससीचा निषेध -
यूएनएससीने गुरुवारी पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याची कठोर शब्दामध्ये निंदा केली होती. त्यावेळी परिषदेने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा निषेध नोंदवला होता. १४ फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्यामध्ये अर्धसैनिक बळाचे ४० सैनिकांना वीरमरण आले होते. त्यावर तब्बल १ आठवड्यानंतर यूएनएससीने हा निषेध नोंदवला.
चीनचा हस्तक्षेप -
या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. तेव्हापासून चीनने या प्रकरणावर कोणत्याही प्रकारचे वक्तव्य नोंदवले नव्हते. चीन हा यूएनएससीचा सदस्य देश आहे. त्यातल्या त्यात चीनला या परिषदेमध्ये व्हिटो पावर आहे. त्याच्या हस्तक्षेपामुळेच यूएनएससीनेही आत्तापर्यंत या हल्ल्यावर निषेध नोंदवला नव्हता, असे म्हटले जात आहे.
यूएनएससीने या हल्ल्याची निंदा केल्यानंतर चीन खळबळून जागा झाला आहे. यूएनएससीने नोंदवलेल्या निषेधामध्ये जैश-ए-मोहम्मदचे नाव सामान्य पद्धतीने वापरण्यात आले, असे चीनने नोंदवले आहे. त्यामुळे यूएनएससी जैश-ए-मोहम्मदचा विरोध करतो, असे म्हणता येत नाही. अशा आशयाची प्रतिक्रिया चीनने नोंदवली आहे.
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये मजबूत राजकीय संबंध आहेत. त्यामुळे चीन नेहमी पाकिस्तानची बाजू घेत असतो. यापूर्वीही परिषदेने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरवर प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, वेळोवेळी चीनने याचा विरोध केला आहे.