नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने राजपत्र अधिसूचना जारी करून देशातील गिर्यारोहणासाठी खुल्या असलेल्या शिखरांवर चढाई करण्याविषयी नवे नियम लागू केले आहेत. यापुढे पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि चीनचे नागरिक असलेल्या गिर्यारोहकांना या पर्वतांवर चढाई करण्यासाठी भारत सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. शिवाय, त्यांना ठरवून दिलेल्या मार्गानेच चढाई करता येणार आहे.
भारतीय गिर्यारोहण संस्थेकडून (IMF) या चार देशांतील गिर्यारोहकांना मार्ग ठरवून देण्यात येतील, असे गृहमंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे. या नव्या नियमाने परदेशी गिर्यारोहकांसाठी असेलल्या ७० वर्षे जुन्या नियमाला मोडीत काढले आहे. शुक्रवारी राजपत्र अधिसूचना जारी करून हा नवा नियम बनवण्यात आला. सर्वांसाठी गिर्यारोहणासाठी खुल्या असलेल्या या पर्वतशिखरांवर चढाई करण्यासाठी या चार देशातील रहिवाशांना आता परवानगी घ्यावी लागणार आहे.
आयएमएफचे संपर्क अधिकारी या देशांतील गिर्यारोहकांसाठी मार्ग ठरवतील. तसेच, आवश्यकतेनुसार, त्यांच्यावर इतर निर्बंधही घालतील, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
भारतामध्ये सध्या सर्वांसाठी गिर्यारोहणासाठी खुली असलेली जवळपास २०० पर्वतशिखरे आहेत. यापैकी देशाने १३७ पर्वतशिखरांचा नुकताच गिर्यारोहणासाठी खुल्या असलेल्या यादीत समावेश केला आहे. यामध्ये कांचनजंगा, सिक्कीममधील नेपाळ शिखर, उत्तराखंडमधील गरूर पर्बत आणि पूर्बी दुनागिरी, जम्मू-काश्मीरमधील माऊंट कैलास आणि हिमाचल प्रदेशातील मुलकिला या पर्वतशिखरांचा समावेश आहे.
'या' चार देशांच्या नागरिकांना भारतातील पर्वतशिखरांवर गिर्यारोहणासाठी परवानगी आवश्यक
या पर्वतशिखरांव्यतिरिक्त इतर कोणत्याही पर्वतशिखरांवर कोणत्याही परदेशी नागरिकाला किंवा नागरिकांच्या गटाला लेखी परवानगीशिवाय चढाई करता येत नाही. मात्र, खुल्या असलेल्या पर्वतशिखरांवर चढाई करणे त्यांना सहज शक्य आहे. मात्र, आता पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि चीनच्या नागरिकांना खुल्या पर्वतशिखरांवर चढाई करण्यासाठीही परवानगीची गरज पडणार आहे.