बीजिंग -सोमवारी भारताने चांद्रयान-२ चे यशस्वी प्रक्षेपण केले. अमेरिका, चीन आणि रशियानंतर अशी कामगिरी करणारा भारत चौथा देश ठरला आहे. यासाठी चायना नॅशनल स्पेस अॅडमिनिस्ट्रेशनचे प्रमुख वु वेईरन यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहेत.
चांद्रयान-२ च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताकडून प्रेरणा मिळत आहे - चीन
भारताचे चांद्रयान-२ मिशन यशस्वी व्हावे. चीनही स्वत:च्या चंद्र मोहिमेवर सक्रियरित्या पुढे जात आहे. भारत, अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडून अंतराळात जाण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतून चीनही प्रेरणा घेत आहे.
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्स माध्यमातून प्रतिक्रिया देताना वु वेईरन म्हणाले, भारताचे चांद्रयान-२ मिशन यशस्वी व्हावे. चीनही स्वत:च्या चंद्र मोहिमेवर सक्रियरित्या पुढे जात आहे. चंद्र मोहिमेतून चीनला दुसऱ्या कोणत्याही देशासोबत प्रतिस्पर्धा करायची नाही. भारत, अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडून अंतराळात जाण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतून चीनही प्रेरणा घेत आहे. पुढील ५ वर्षात भारत, अमेरिका आणि इस्रायल चंद्रावर अंतराळवीर पाठवण्याची योजना आखत आहेत.
भारताच्या चांद्रयान-2 या महत्वाकांक्षी मोहिमेकडे देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागून राहिले होते. त्याला कारण म्हणजे भारताचे हे चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर म्हणजेच ज्या ठिकाणी सूर्याची किरणे पोहोचत नाहीत, त्या भागामध्ये उतरणार आहे. विशेष म्हणजे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा म्हणजेच अलगद उतरणाऱ्या देशांमध्ये भारताचा चौथा नंबर लागणार आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. चंद्राचा भूगर्भ आणि पृष्ठभाग कसा आहे, चंद्रावर कोणकोणते वायू आहेत, खनिजे कोणती आहेत, वातावरण कसे आहे, अशा प्रकारची माहिती रोव्हर गोळा करणार आहे. भारताच्या या कामगिरीनंतर आपण संपूर्ण जगाला मार्गदशक असणार आहोत.