रांची- रक्षाबंधनादिवशी बहिण-भावाच्या प्रेमातील अतूट नाते दाखविणारी घटना समोर आली आहे. दंतेवाडात आठ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी हा बहिणीला भेटण्यासाठी रक्षाबंधनादिवशी गावी परतला. बहिणीने विनंती केल्यानंतर हा मल्ला नावाचा नक्षलवादी पोलिसांना शरण आला आहे.
मल्ला हा वयाच्या 12 व्या वर्षी नक्षल चळवळीत सामील होण्यासाठी घरातून पळून गेला होता. तो रक्षाबंधनाच्या दिवशी 14 वर्षानंतर दंतेवाडा जिल्ह्यातील पालनार गावात परतला आहे.
गेली काही वर्षे बहीण लिंगाय हिची भेट न झाल्याने मल्ला हा तिला भेटण्यासाठी परतला होता. भावाच्या अचानक झालेल्या भेटीने आश्चर्याचा धक्का बसलेल्या लिंगायने भावाला जंगलात जाण्यापासून रोखले. सुरक्षा दलाकडून नक्षलवादी मारले जात आहेत. अशा परिस्थितीत तिने पोलिसांना शरण जा, असा सल्ला भावाला दिला. मल्लाने पूर्वीच्या आयुष्याबाबत माहिती देताना सांगितले, की 2016 पासून तो प्लाटून डेप्युटी कमांडर आहे. ही प्लाटून भैरामगढ परिसरात आहे.