जयपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सगळीकडे स्वच्छता करण्यात येताना दिसून येत आहे. सर्व ठिकाणे सॅनिटाईज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, यातच राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार आज समोर आला. जयपूरच्या जवाहर नगरमध्ये अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रस्ते आणि घरांसोबतच लहान मुलांवर आणि लोकांवरही केमिकलचा फवारा केला.
राजस्थानमध्ये चिमुकल्यांना घातली केमिकलने अंघोळ; अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांचा प्रताप! शहराच्या जवाहर नगर परिसरातील एका वस्तीमध्ये अग्निशामक दलाचे कर्मचारी सॅनिटायझेशन प्रक्रियेसाठी गेले होते. यावेळी ते रस्त्यांवर तसेच घरांवर सोडियम हायपोक्लोराईड या केमिकलची फवारणी करत होते. मात्र यावेळी त्यांनी निष्काळजीपणे घराबाहेर असलेल्या लोकांना आणि चिमुरड्यांनाही केमिकलने अंघोळ घातली.
यावेळी लोकांनी विरोध दर्शवताच हे कर्मचारी तिथून निघून गेले. लोकांचा असा आरोप आहे, की सॅनिटायझेशनचे काम हे जबाबदारीने होत नाही. कर्मचारी केवळ मुख्य रस्ता आणि त्याच्या आजूबाजूच्या घरांवर फवारणी करत आहेत. छोट्या गल्ल्यांमध्येही हे काम झाले पाहिजे.
उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्येही सोमवारी असाच प्रकार समोर आला होता. तिथे परराज्यातून आलेल्या लोकांना एकत्र बसवून केमिकलने अंघोळ घालण्यात आली होती. त्यानंतर कित्येक लोकांच्या डोळ्यामध्ये जळजळ होण्यास सुरूवात झाली होती.
हेही वाचा :लॉकडाऊनमुळे 600 किलोमीटर पायी निघाले होते कामगार, ईटीव्ही भारतने केली मदत