नवी दिल्ली - राफेल करारासंबंधात मागील वर्षी १४ डिसेंबरला दिलेल्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या स्पष्ट आणि ठोस निष्कर्षांचा फेरविचार व्हावा, अशी कोणतीही त्रुटी सकृतदर्शनी दिसत नाही, असा दावा केंद्र सरकारने शनिवारी न्यायालयात केला. राफेलप्रकरणी देण्यात आलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा, अशी विनंती करणारी याचिका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि अॅड. प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
राफेल करारात अनियमितता आढळली असल्याचा दावा या याचिकेत केला आहे. ही याचिका प्रसारमाध्यमांमधील काही वृत्ते आणि अनधिकृतपणे व अवैधपणे प्राप्त केलेल्या काही अपूर्ण फाईल्समधील नोंदींच्या आधारे करण्यात आली आहे. त्यामुळे या फेरविचार याचिकेची व्याप्ती अत्यंत मर्यादित आहे, असा दावा केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.