नवी दिल्ली -सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगनाने काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. या प्रकारानंतर मोठा वाद निर्माण झाल्याने कंगनाला वाय सुरक्षा पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याबाबत कंगनाने टि्वट करून माहिती दिली. वाय दर्जाची पुरवल्याबद्दल कंगनाने गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले.
'मी अमित शाह यांची आभारी आहे. त्यांना वाटले असते तर ते मला काही दिवसानंतर मुंबईला जाण्याचाही सल्ला देऊ शकले असते. मात्र, त्यांनी भारताच्या सुपुत्रीच्या वचनांचा मान ठेवला, आमच्या स्वाभिमान आणि आत्मसम्मानाची लाज राखली, जय हिंद', असे टि्वट कंगनाने केले आहे.
हिमाचल मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी कंगनाला वाय सुरक्षा पुरवल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. कंगना ही हिमाचलची कन्या आहे आणि तिची सुरक्षा आमची जबाबदारी आहे, असे ते म्हणाले.
हिमाचल मुख्यमंत्री जयराम ठाकूर सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी कंगना रणौत आणि संजय राऊत यांच्या दरम्यान आरोप-प्रत्यारोप झाले. मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीर वाटत असल्याचं वक्तव्य केल्यानंतर कंगना रणौतवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. त्यानंतर शिवसेनेकडून कंगनाला मुंबईत येऊ देणार नाही, अशी धमकी देण्यात आली. कंगनाने यावर ट्विट करत आपल्याला मुंबईत येण्यावरुन धमक्या मिळत असून 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे. कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर रोखून दाखवा असं थेट आव्हान केलं आहे. यानंतर मात्र शिवसैनिकांनीही कंगनाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
काय असते वाय दर्जाची सुरक्षा -
हा सुरक्षेचा तिसरा स्तर आहे. कमी धोका असणाऱ्या लोकांना ही सुरक्षा दिली जाते. यामध्ये एकूण 11 सुरक्षा जवान असतात. त्यामध्ये दोन पीएसओ (खासगी सुरक्षारक्षक) देखील असतात. यामध्ये कोणत्याही जवानाचा समावेश नसतो. भारतामध्ये सर्वात अधिक वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात येत असते.