नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग आणि आनंद ग्रोव्हर यांच्या मुंबई आणि दिल्ली येथील घरांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. लॉयर्स कलेक्टिव्ह या संस्थेच्या कार्यालयावरही सीबीआयने छापेमारी केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून परदेशातून जमा केलेल्या निधीमध्ये अफरातफर केल्याचा ठपका दोघांवरही ठेवण्यात आला आहे.
आनंद ग्रोव्हर आणि इंदिरा जयसिंग यांची लॉयर्स कलेक्टिव्ह ही संस्था आहे. इंदिरा जयसिंग या २००९ ते २०१४ या कालावधीत एडिशनल सॉलिसिटर जनरल या पदावर कार्यरत होत्या. या कालावधीत लॉयर्स कलेक्टिव्ह या संस्थेसाठी त्यांनी इतर देशांमधून निधी गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच, त्यांनी या निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही लॉयर्स कलेक्टिव्ह विरोधात करण्यात आलेल्या याचिकेत आहे. गृह मंत्रालयाने ही याचिका दाखल केली होती.
लॉयर्स कलेक्टिव्ह या संस्थेने विदेशी निधीसंदर्भातल्या कायद्याचे अर्थात FCRA चे उल्लंघन केले आहे, हे स्पष्ट झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने या संस्थेचा परवाना रद्द केला. ज्यानंतर सीबीआयने या प्रकरणी आनंद ग्रोव्हर आणि लॉयर्स कलेक्टिव्हविरोधात तक्रार दाखल केली. या छापेमारीदरम्यान आनंद ग्रोव्हर यांच्याशी प्रसारमाध्यमांनी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, त्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले आहेत.दरम्यान, या छापेमारीवर राजकीय प्रतिक्रिया येण्यासही सुरुवात झाली आहे. सीबीआयने अशा प्रकारे कायद्याचे रक्षण करणाऱ्यांच्या घरांवर छापेमारी करणे योग्य नाही असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.