नवी दिल्ली - केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक ऋषी कुमार शुक्ला यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. सीबीआयच्या देशभरातील ७० शाखांचे अधिकारी याला उपस्थित राहणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर शुक्ला यांची ही पहिलीच बैठक आहे.
सीबीआय संचालकांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक; पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच घेणार आढावा
सीबीआयच्या देशभरातील ७० शाखांचे प्रमुख यात सहभागी होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सीबीआय अनेक प्रकरणात वादग्रस्त ठरली आहे. सीबीआयच्या अंतर्गत वाद, पश्चिम बंगालचे प्रकरण यात सीबीआयवर चोहोबाजूने टीका झाली होती. या प्रकरणावर संचालक आढावा घेण्याची शक्यता आहे. यावर सर्व अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत. सीबीआयच्या ७० शाखांच्या प्रमुखांपैकी काही प्रत्यक्ष उपस्थित असतील, तर काही व्हीडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधतील.
या बैठकीत पोन्झी घोटाळा, श्रीजन घोटाळा, मुजफ्फरपूरमधील शेल्टर होममधील मुलीवर अत्याचार प्रकरण, बिकानेर जमीन प्रकरण, हरियाणा भूखंड घोटाळा, अवैध खाण घोटाळा, गुटका घोटाळा आदी केसेसवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुक्ला हे १९८३ बॅचचे आयपीएस ऑफीसर आहेत. याआधी त्यांनी पोलीस महासंचालक पदावर मध्यप्रदेशात काम पाहिले आहे. पण, सीबीआयमध्ये त्यांची ही पहिलीची नेमणूक आहे.