तिरुअनंतपूरम - नागरी उड्डाण मंत्रालयाने कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इटली आणि दक्षिण कोरियामधील भारतीय नागरिकांना भारतात येण्याआधी कोरोनाची चाचणी अनिवार्य केली आहे. ५ तारखेला लागू केलेले हे परिपत्रक मागे घेण्याची मागणी केरळच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली आहे. भारतामध्ये आल्यावर त्यांची तपासणी करण्यात यावी, असे पिनराई विजयन यांनी म्हटले आहे.
इटली आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे लक्षणे दिसल्याशिवाय तेथील आरोग्य विभाग चाचणी करत नाही. मात्र, भारताने कोरोनाची लागण झाली नाही, असा अहवाल असल्याशिवाय भारतात येण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे अनेक नागरिक विमानतळांवर अडकून पडले आहेत.