रायपूर - लग्न समारंभ पार पडल्यानंतर नवविवाहित जोडपे हनीमूनला जातात. मात्र, हे सर्व कोरोनाच्या आधी शक्य होते. छत्तीसडमधील एका जोडप्याला लग्न झाल्यानंतर हनीमून ऐवजी क्वारंटाईन सेंटरमध्ये जावे लागले. हनीमून तर दुरच त्यांना घरीसुद्धा जाता आले नाही. त्याला कारण म्हणजे कोरोनामुळे देशभर पाळण्यात येत असलेलं सोशल डिस्टन्सिंग. इतरांच्या सुरक्षिततेसाठी नवविवाहित जोडप्याची रवानगी क्वारंटाईन सेंटरमध्ये केली आहे. ही घटना राज्यातील कोरिया जिल्ह्यात घडली.
लग्नाची सुंदर स्वप्ने रंगवणाऱ्या वधू आणि वराने लग्नानंतर आपल्यावर अशी वेळ येईल याचा कधी विचारही केला नसेल, मात्र, आता त्यांना १४ दिवसांचा वनवास सहन करावा लागणार आहे. मध्यप्रदेशातली नौरोजाबाद येथून लग्न करून माघारी छत्तीगडमध्ये जात असताना त्यांना पोलिसांनी अडविले. कोरिया जिल्ह्यातील मनेंद्रगड या गावी पोलिसांनी त्यांना जाऊ दिले नाही. क्वारंटाईन सेंटरमध्ये जाण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्याबरोबर मुलाच्या आईलाही क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.