नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने आज एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने सरन्यायाधीशांचे कार्यालय आता माहिती अधिकाराच्या कक्षेत येणार असल्याचा निर्णय दिला. सरन्यायाधीशांचे कार्यालय हा सार्वजनिक अधिकारात असल्याचेही न्यायालयाने सांगितले आहे. तसेच, यामुळे पारदर्शकता राहील आणि ती न्यायिक स्वातंत्र्याला अडथळा ठरणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायमूर्ती एन. वी. रमण, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना या पाच न्यायाधीशांच्या या संविधान पीठाने हा निर्णय दिला. या पीठाने उच्च न्यायालय आणि केंद्रीय सूचना आयोगाच्या (सीआईसी) आदेशांविरोधात 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव आणि केंद्रीय माहिती व जनसंपर्क अधिकाऱ्यांद्वारे केलेल्या अपीलांवर गत चार एप्रिलला निर्णय सुरक्षित ठेवला होता.