आगरतळा- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोरच एका कार्यक्रमात व्यासपीठावर एका भाजप नेत्याने महिला नेत्याचा विनयभंग केला. या घटनेनंतर संपूर्ण त्रिपूरा राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. आरोपी मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत. मात्र, सरकारकडून अद्यापही कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही.
पंतप्रधान मोदी यांच्यासमोरच महिला नेत्याचा विनयभंग; मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी
त्या महिला नेत्या त्रिपुराच्या समाज कल्याण आणि शिक्षण मंत्री आहेत. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया आत्तापर्यंत समोर आलेली नाही
शनिवारी पंतप्रधान मोदी त्रिपूराच्या दौऱ्यावर होते. दरम्यान एका कार्यक्रमामध्ये विकास कामांचे उद्धाटन करण्यासाठी नेत्यांसह ते व्यासपीठावर चढले होते. त्यावेळी तेथे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव हेही उपस्थित होते. त्या प्रसंगी त्यांच्याच मंत्री मंडळातील राज्य मंत्री मनोज कांती देव हे तेथे उपस्थित असलेल्या एका महिला नेत्याच्या कमरेवर आक्षेपार्ह पद्धतीने हात लावताना आढळले. त्या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
त्या महिला नेत्या त्रिपुराच्या समाज कल्याण आणि शिक्षण मंत्री आहेत. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रीया आत्तापर्यंत समोर आलेली नाही. तर, केंद्रासह राज्य सरकारनेही यावर मौन धारण केलेले आहे. पंतप्रधान मोदी उपस्थित असतानाही अशी घटना घडल्यामुळे राजकीय वर्तुळात भाजपवर प्रचंड टीका करण्यात येत आहे.
त्रिपुरातील विरोधी पक्ष या घटनेनंतर भाजप सरकारवर आक्रमक झाले आहेत. आरोपाचा ठपका असलेले मनोज कांती देव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी तेथे जोर धरू लागली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाल्यानंतर, ही घटना प्रकाशात आली.