नवी दिल्ली- माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही, त्यामुळे मी मुळीच माफी मागणार नाही असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधींनी केल्यावरून भाजप पुरता बिथरला आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी राहुल गांधीच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
राहुल गांधीनी शंभर जन्म घेतले तरी त्यांना राहुल सावरकर होता येणार नाही. सावरकर हे वीर, देशभक्त आणि त्यागी होते. जर राहुल गांधीना नवीन नाव पाहिजे असेल भाजप त्यांना 'राहुल थोडा शर्म कर' राहुल गांधी थोडी लाज बाळगा या नावाने बोलवेल. त्यांनी थोडी तरी लाज बाळगायला हवी. जो व्यक्ती 'मेक इन इंडिया'ला 'रेप इन इंडिया' म्हणतो. त्या व्यक्तीने सर्व प्रतिष्ठा गमावली आहे. सर्जिकल स्ट्राईक, कलम ३७०, नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, एअर स्ट्राईक यावर राहुल गांधी पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, असे म्हणत संबित पात्रा यांनी राहुल गांधीवर जोरदार टीका केली.
हेही वाचा -केजरीवाल यांच्या 'आप' ची धूरा प्रशांत किशोरांच्या आय-पॅकच्या हाती
'मला संसदेत भाजपच्या लोकांनी माफी मागायला सांगितली. मात्र, मी मुळीच माफी मागणार नाही. एकवेळ मरण पत्करेन पण कोणाचीही माफी मागणार नाही. माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही, असे राहुल गांधी म्हणाले होते. देशभरामध्ये होत असलेल्या बलात्काराच्या घटनांननतर राहुल गांधीनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले होते.
हेही वाचा -'मरण पत्करेन पण माफी मागणार नाही.. माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही'
काय म्हणाले होते राहुल गांधी-
वायनाडमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी भारत जगाची 'रेप कॅपिटल' म्हणजेच बलात्कारांची राजधानी आहे, असे म्हटले होते. तर झारखंडमध्ये त्यांनी भारत 'मेक इन इंडिया' नाही तर रेप इन इंडिया झाला आहे, असे वक्तव्य केले होते.
हेही वाचा -भारत बचाओ रॅली : 'देशात भांडणे पेटवून मूळ मुद्यांना बगल देणं हाच भाजपचा डाव'
उत्तरप्रदेशात भाजपचा आमदार बलात्कार करतो, त्यानंतर पीडितेचा अपघात होतो. मात्र, मोदी यावर काहीही बोलत नाहीत, असे राहुल गांधी म्हणाले होते. नरेंद्र मोदी म्हणतात, बेटी बचाओ बेटी पढाओ. मात्र, मोदी हे सांगत नाहीत की, बेटींचा कोणापासून बचाव करायचा आहे. तर देशातील मुलींचा भाजपच्या आमदारांपासून बचाव करायचा आहे, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधीच्या या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.