मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार अल्पमतात, राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची भाजपची मागणी
भाजप नेते गोपाळ भार्गव यांनी कमलनाथ सरकार आपोआप कोसळेल असा दावा केला आहे. त्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. मध्यप्रदेश विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
भोपाळ - मध्य प्रदेशातले कमलनाथ सरकार अल्पमतात असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजप नेते राकेश सिंह आणि गोपाळ भार्गव यांनी 'कमलनाथ सरकार कोसळण्याची शक्यता आहे. माझा घोडेबाजारावर विश्वास नाही. आम्ही राज्यपालांना पत्र लिहून विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी करत आहोत,' असे म्हटले आहे. मात्र, कमलनाथ सरकार स्थिर आणि बळकट आहे असा दावा काँग्रेसने केला आहे.
लोकसभा निवडणुकांचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. मात्र एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. बहुतेक एक्झिट पोल्सनी एनडीएला बहुमत मिळेल आणि मोदीच पंतप्रधान होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. आता भाजप नेते गोपाळ भार्गव यांनी कमलनाथ सरकार आपोआप कोसळेल असा दावा केला आहे. त्यांनी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. मध्यप्रदेश विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
मध्यप्रदेश विधासभा निवडणूकीचा निकाल लागून सहा महिने उलटले आहेत. मात्र, लोक या सरकारच्या कामगिरीबाबत समाधानी नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे अंदाज हे स्पष्ट करत आहेत की मध्यप्रदेशात काँग्रेसकडे बहुमत राहिलेले नाही. त्याचमुळे विधानसभेच्या विशेष अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे असेही भार्गव यांनी म्हटले आहे. या घडामोडींनंतर काँग्रेसनेही भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाने स्वप्न पहाणे बंद करावे, असे उत्तर काँग्रेसने दिले आहे. नियमानुसार विधानसभेचे अधिवेशन बोलवण्यास काहीही हरकत नाही. मात्र, ते एखाद्या विधेयकासंबंधी असेल तर ठीक आहे. भाजपाकडून जो दावा केला जातो आहे तो खोटा आहे. त्यात काहीही तथ्य नाही, असे काँग्रेस नेते मुकेश नायक यांनी म्हटले आहे.