नवी दिल्ली - ईशान्य दिल्ली हिंसाचारामध्ये तब्बल 42 जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारा दरम्यान ठार झालेल्या गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा आणि हेड कॉन्स्टेबल रतनलाल यांच्या कुटुंबीयांना पश्चिम दिल्लीचे खासदार प्रवेश वर्मा आपला एक-एक महिन्याचा पगार मदत म्हणून देणार आहेत.
भाजप खासदार प्रवेश वर्मा यांनी टि्वट करून यासंबधित माहिती दिली आहे. 'दिल्लीमध्ये दुर्भाग्यपूर्ण हिंसाचारामध्ये आपले कर्तव्य पार पाडताना, गुप्तचर विभागाचे (आयबी) अधिकारी अंकित शर्मा आणि हेड कॉन्स्टेबल रतनलाल हुतात्मा झाले. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून मी माझा एक-एक महिन्याचा पगार समर्पीत करतो, जय हिंद', असे प्रवेश वर्मा यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
प्रवेश वर्मा यांनी सीएएविरोधी आंदोनलावर दिल्ली निवडणुकांच्या प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्ये केली होती. 'शाहीन बागेतील आंदोलक घरात घुसून महिलांवर बलात्कार करू शकतात', असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच एका कार्यक्रमामध्ये त्यांनी मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. मुसलमानांनी भाजपला कधी मतदान केलेले नाही, आणि ते करणारही नाही. कारण,भाजप हा राष्ट्रभक्त पक्ष आहे, असे प्रवेश वर्मा यांनी म्हटले होते.
दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा वाढून ४२ झाला आहे. गंभीर जखमी असेलल्या नागरिकांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू होत आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी अनेक भागांत कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तीन दिवस चाललेल्या हिंसाचारात २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.