भांगर (पश्चिम बंगाल) - पश्चिम बंगालमध्ये पुढीलवर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. याआधीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपमध्ये जोरदार शाब्दीक युद्ध सुरू आहे. तृणमूल कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी खळबळजनक आरोप केला आहे. जर भाजपाला निवडणूक जिंकता आली नाही तर ते 'मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हत्येचा कट रचू शकतात', असा आरोप सुब्रत मुखर्जी यांनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांना नुकसान करण्याचा प्रयत्न कराल तर...-
बंगालचे पंचायत मंत्री मुखर्जी म्हणाले, भाजपा जर कोट्यावधी नागरिकांची आई, ममता बॅनर्जी यांना नुकसान करण्याचा प्रयत्न करीत असेल तर आम्ही त्यांना असे करण्यापासून रोखू. बंगालमध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी बाहेरील लोकांना आणले जात आहे. आम्ही त्यांची योजना यशस्वी होऊ देणार नाही. मुखर्जी शनिवारी दक्षिण 24 परगणा येथे रस्ता उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
मुखर्जी यांच्या आरोपावर भाजपची प्रतिक्रिया-
दरम्यान, मुखर्जी यांच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष म्हणाले, "सतत कमी होत चाललेल्या जनतेच्या पाठिंब्यामुळे तृणमूल कॉंग्रेसचे नेते असे आरोप करीत आहेत."