बिस्वनाथ (आसाम) - बिजुली प्रसाद हे कोण्या व्यक्तीचे नव्हे तर, एका हत्तीचे नाव आहे. हा आशिया खंडातील सर्वात वयोवृद्ध हत्ती असून त्याचे वय ८६ वर्ष आहे. हा हत्ती आसामच्या बिस्वनाथ जिल्ह्यातील बेहाली टी इस्टेटकडे आहे.
आशिया खंडातील सर्वात वयोवृद्ध हत्ती 'बिजुली प्रसाद' जवळपास ५२ वर्षांपूर्वी या हत्तीला विलियमसन मॅगोर चहा मळ्याने विकत घेतलं होते. तेव्हा तत्कालीन ब्रिटिश अधिकारी जॉन ऑलिवर यांनी त्याचे नाव बिजुली प्रसाद असे ठेवले. यानंतर, त्याला सन २०१८ मध्ये बेहाली टी इस्टेटमध्ये आणण्यात आले. अत्यंत शांत स्वभावाच्या या हत्तीची खूपच कमी वेळात तेथील सर्व कर्मचाऱ्यांशी मैत्री झाली. आम्ही कधीही त्याला कोणावर रागवताना, आक्रमण करताना बघितले नसल्याचे येथील कर्मचारी सांगतात.
बिजुली प्रसाद हा अल्पावधीतचं विलीयमसन मॅगोर कंपनीचे प्रतीक बनला आहे. ही कंपनी बिजुलीच्या देखरेखीवर दर महिन्याला तब्बल ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च करते. त्यांची संपूर्ण जबाबदारी येथील चहा मळ्याचे व्यवस्थापक कुलजीत बोरा यांच्याकडे आहे. त्याच्या जेवणाचेही ठराविक वेळपत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसारचं त्याला जेवण दिले जाते. यात २५ किलो तांदूळ, २५ किलो मका, २५ किलो चण्यांचा समावेश असतो. दर महिन्याला त्याचे मेडिकल चेकप आणि वजन मोजमापही केले जाते. त्याचे वजन सुमारे ४ हजार किलो आहे.
बिजुली आजपर्यंत कधीच कोणाशीही आक्रमकपणे वागलेला नाही. माहुताशी त्याचं अतिशय स्नेहपूर्ण नातं आहे. यामुळेच, आशियातील सर्वात वयोवृद्ध हत्ती म्हणून प्रसिद्ध असलेला बिजुली प्रसाद हा विलियमसन मॅगोर कंपनीसह संपूर्ण आसामसाठी एक गौरव ठरला आहे.