नवी दिल्ली -देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून दिवसागणीक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या चिंताजनक परिस्थितीमध्ये एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत बायोटेक निर्मित देशातील कोरोनाची पहिली लस 'कोव्हॅक्सिनचे' क्लिनिकल ट्रायल 375 मनुष्यावर सुरू करण्यात आले आहेत. भारत बायोटेकच्या सुत्रांनी ही माहिती दिली.
स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिन चाचणीचा पहिला टप्पा 15 जुलैला सुरु करण्यात आला. कोव्हॅक्सिनची 375 जणांवरील चाचणी यादृच्छिक, पूर्णपणे गोपनीय (डबल ब्लाइंड) आणि प्रायोगिक औषध नियंत्रित आहे.
क्लिनिकल चाचणी ट्रायलमध्ये पूर्णपणे गोपनीय (डबल ब्लाइंड) म्हणजे, रुग्ण किंवा संशोधक दोघांनाही हे माहित नसते की, प्रायोगिक औषध कोणाला दिले जात आहे आणि कोणावर सामान्यपणे उपचार केले जात आहेत. भारत बायोटेकला नुकताच कोव्हॅक्सिन या लसीच्या वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी मिळाली होती. भारतीय बायोटेक कंपनीने तयार केलेले कोव्हॅक्सिन या लसीची चाचणी उंदीर आणि ससे या प्राण्यांवर यशस्वीरित्या करण्यात आली आहे. यानंतर, त्याचा प्रयोग माणसांवर करण्यास सुरूवात झाली आहे.
कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी सध्या सात लसी विकासाच्या विविध टप्प्यात आहेत, त्यापैकी दोन लसींना मानवांवर क्लिनिकल चाचण्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. भारत बायोटेकने कोरोनावर कोव्हॅक्सिन ही लस विकसित केली आहे. तर अहमदाबादची कंपनी झायडस कॅडिलाने देखील कोरोनाला रोखणारी लस बनवली आहे. कोव्हॅक्सिन आणि झायकोव्ह-डी या दोन्ही स्वदेश लसी आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी या दोन्ही लसींची निर्मिती करण्यात आली आहे. या दोन्ही लसींवर प्रयोग करण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून परवानगी मिळाली आहे.
मानवी चाचणी येत्या १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचा आयसीएमआरचा मानस आहे. कोरोनासाठी जगभरात सध्या १४५हून अधिक लसींची निर्मिती करण्यात येत आहे. यांपैकी केवळ २० लसींना मानवी चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे.