हैगराबाद -भारत बायोटेक या कंपनीने लसीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या लसीची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाल्याची माहिती देशातील अग्रगण्य व्हॅक्सिन कंपनी भारत बायोटेकने दिली आहे.
भारत बायोटेक या लस बनवणाऱ्या कंपनीने लसीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. भारतासह जगभरात विविध ठिकाणी कोरोनरील लस शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी लसींची तिसरी ट्रायल सुरू झाली आहे. आता लसीसंदर्भात भारत बायोटेकने माहिती देत प्राण्यांवर लसीकरणाचा सकारात्मक प्रभाव नोंदवण्यात आल्याचे सांगितले. यामुळे कोरोना विरुद्धच्या लढाईला आणखी बळ मिळणार आहे.
भारत बायोटेकने बनवलेल्या लसीची प्राण्यांवरील ट्रायल यशस्वी झाली असून या प्रक्रियेत प्राण्यांमध्ये कोरोनाविरोधातील अॅन्टिबॉडिज् तयार झाल्याचे सिद्ध झाले आहे. लसीकरणाच्या या प्रक्रियेतील प्राण्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार झाल्याचे पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले आहेत.
स्वयंसेवकांवरही यशस्वी चाचणी
5 सप्टेंबरला सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनला यासंदर्भात लसीची चाचणी करण्याचा परवाना मिळाला होता. डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसने देखील याचा अनुमती दिली होती. याअंतर्गत फेज -२ च्या ट्रायल्स पार पडल्या आहेत. त्याचे अहवाल सकारात्मक आल्याचे भारत बायोटेकने सांगितले.
15 जुलैपासून देशातील विविध 12 सेंटर्समध्ये वेगवेगळ्या स्वयंसेवकांमार्फत फेज -१ च्या ट्रायल्स घेण्याची परवानगी देण्यात आली होती. स्वयंसेवकांना 14 दिवसांच्या अंतराने लसीकरण करण्यात आले. यामध्ये त्यांना दोन डोस देण्यात आले. अद्याप 375 स्वयंसेवकांवर या चाचण्या सुरू आहेत.
इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या सहकार्याने भारत बायोटेकने कोव्हॅक्सिन यशस्वीरित्या विकसित केले आहे.