भोपाळ -मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये झालेल्या सामूहिक अत्याचारानंतर पीडित अल्पवयीन मुलीने नराधमांच्या सततच्या त्रासाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित मुलगी ९० टक्के भाजली होती, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर, पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथे हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. पीडित मुलगी ही ८ व्या वर्गात शिकत होती, तिच्यावर दीड महिन्यांपूर्वी तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केला होता. संदीप, अजय, नितेश असे नराधमांची नावे आहेत.
माहितीनुसार, देवगाव येथील एका १४ वर्षीय मुलीवर गावातीलच तीन नराधमांनी दीड महिन्यापूर्वी सामूहिक अत्याचार केला आणि याबाबत कुठे वाच्यता न करण्याबाबत धमकावले. या घटनेनंतर ते तीनही नराधम तिला सतत त्रास द्यायचे, तिला दररोज याबाबत कुठेही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचे. या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने काल (मंगळवार) संध्याकाळी रॉकेल ओतून स्वत:ला आग लावून घेतली. या घटनेत ती ९० टक्के भाजली गेली, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नागपुरात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.