कोलकाता - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी आज (गुरुवार) पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. 'बंगाल सरकार हिंदुविरोधी मानसिकतेचं असून त्यांच्या योजना अल्पसंख्यकांना खुश करण्यासाठी आहेत, असे जे. पी नड्डा म्हणाले. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून राज्यात राजकीय हिंसाचार पसरविण्यात येत असून आत्तापर्यंत १०० भाजप कार्यकर्त्यांचा जीव गेला, असेही ते म्हणाले.
पश्चिम बंगाल राज्यात भ्रष्ट व्यवस्था कार्यरत असून तृणमूलच्या पाठिंब्यावर भू माफिया काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भू माफियांनी रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेत येथील विश्वभारती विद्यापीठालाही सोडले नाही, असे ते म्हणाले.
'जेव्हा संपूर्ण भारत अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाचा सोहळा पाहत होते. तेव्हा स्थानिकांनी या उत्सवात भाग घेऊ नये म्हणून ममता बँनर्जी यांनी राज्यात टाळेबंदी जाहीर केली होती. याच्या विपरीत म्हणजे बकरी ईदला टाळेबंदी खोलण्यात आली. यातून दिसून येते की, बंगाल सरकारची मानसिकता हिंदुविरोधी असून त्यांची धोरणं अल्पसंख्यकांना खुश करणाऱ्या आहेत, असे नड्डा म्हणाले.
पश्चिम बंगालमधील राजकीय हत्यांवरूनही त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. मला आश्चर्य वाटतंय, लोकशाहीचे रक्षणकर्ते १०० भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येवर शांत का आहेत? असे नड्डा म्हणाले. पुढील वर्षीच्या राज्यातील विधानसभा निवडणूकीचा आराखडाही त्यांना मांडला. ' २०११ साली आम्हाला बंगालमध्ये २ टक्के मते मिळील तर आमच्या ४ जागा आल्या. २०१४ साली आमच्या दोन जागा आल्या मात्र, मते १८ टक्के मिळाली. तर २०१९ साली आमच्या मतांचा टक्का ४० वर पोहचला. याच गतीने आम्हाला चालावे लागेल, तेव्हा येत्या निवडणुकीत आम्ही टीएमसीला पराभूत करू, असे नड्डा म्हणाले.