पणजी - माजी आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. २०१५ मध्ये आमदार असताना पक्षविरोधी कृतीमुळे काँग्रेसमधून त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या प्रवेशामुळे विधानसभेच्या पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीची चूरस वाढली आहे.
काँग्रेस भवनात आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, आमदार दिगंबर कामत, रवी नाईक, आलेक्स रेजिनाल्ड, बाबूश यांच्या पत्नी आणि काँग्रेस आमदार जेनिफर मोन्सेरात आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
मोन्सेरात म्हणाले, की अपक्ष किंवा अन्य एखाद्या पक्षात प्रवेश करणे माझ्यासमोर पर्याय होते. परंतू, पणजीचा विकास आणि रोजगार यांचा विचार करून मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २५ वर्षे पणजीचे प्रतिनिधित्व केले. परंतू, पणजीचा विकास आणि येथील युवकांना रोजगार देण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे पणजीतील लोकांचा कल विचारात घेत ही घरवापसी केली आहे.