महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

LIVE : खटल्याची २८ वर्षे; अडवाणी-जोशींसह ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता! - बाबरी मशीद विध्वंस प्रकरण निकाल

babri
बाबरी मशीद

By

Published : Sep 30, 2020, 10:32 AM IST

Updated : Sep 30, 2020, 1:55 PM IST

13:30 September 30

अखेर हा कट नव्हता हे सिद्ध झाले - मुरली मनोहर जोशी

विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय ऐतिहासिक आहे. या निकालामुळे आमचे सर्व मोर्चे आणि कार्यक्रम हे कोणत्याही कटाचे भाग नव्हते असे सिद्ध झाले आहे. आम्ही या निकालावर आनंदी असून, आता राम मंदिराच्या उभारणीची वाट पाहत आहोत, असे मत मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केले आहे.

13:23 September 30

निर्णयाचे मनापासून स्वागत - लालकृष्ण अडवाणी

"न्यायालयाच्या निकालाचे मी मनापासून स्वागत करतो. रामजन्मभूमी चळवळीबद्दलच्या माझ्या वैयक्तिक श्रद्धेला भाजपच्या वचनबद्धतेला या निर्णयाने न्याय दिला आहे" असे मत लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले आहे.

13:13 September 30

निकालाचे राजनाथ सिंहांनी केले स्वागत

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाच्या निकालाचे स्वागत केले आहे. उशीरा का होईना मात्र न्यायाचा विजय झाल्याचे या निकालाने सिद्ध झाले असल्याचे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे..

12:35 September 30

सीबीआय पुढे नाही करणार अपील

विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सीबीआय उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

12:33 September 30

निकालानंतर उत्तर प्रदेशात हाय अलर्ट घोषित; जमावबंदी लागू

बाबरी मशीद प्रकरणाच्या निकालानंतर उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. संवेदनशील जिल्ह्यांमध्ये पॅरा-मिलिट्री पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच, कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढण्यावर बंदी आणण्यात आली असून, राज्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

12:24 September 30

बाबरी विध्वंस प्रकरण : सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता!

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या प्रकरणातील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या आरोपींविरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगत न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला. 

न्यायालयाने नोंदवलेली निरीक्षणे..

  • मशीद विध्वंस प्रकरणातील कोणतीही घटना ही पूर्वनियोजीत नव्हती.
  • यावेळी प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांच्या आधारे कोणालाही आरोपी करता येणार नाही.
  • या विध्वंसावेळी नेत्यांनी लोकांना थांबवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, लोक आपल्याच जल्लोशात असल्यामुळे त्यांनी नेत्यांचे ऐकले नाही.

12:12 September 30

सर्व आरोपी न्यायालयात हजर; काहींची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती

या प्रकरणातील सर्व आरोपी न्यायालयात हजर झाले असून, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शवली आहे. 

10:53 September 30

खटल्यातील आरोपी न्यायालयात हजर होण्यास सुरुवात; न्यायाधीशही पोहोचले

खटल्यातील आरोपी न्यायालयात हजर होण्यास सुरुवात..

खटल्यातील आरोपी न्यायालयात येण्यास सुरूवात झाली आहे. बहुतांश आरोपी हे न्यायालयात दाखल झाले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, साक्षी महाराज, शिवसेना नेते पवन पांडे, विश्व हिंदू परिषदेचे चंपत राय यांच्यासमवेत इतर आरोपी न्यायालयात हजर राहतील. दरम्यान, न्यायाधीश सुरेंद्र यादवही न्यायालयात पोहोचले असून, खटल्याची सुनावणी लवकरच सुरू होणार आहे.

10:25 September 30

न्यायालय परिसराचे सॅनिटायझेशन; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतली जात आहे खबरदारी

न्यायालय परिसराला केले सॅनिटाईझ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून न्यायालयाचा परिसर सॅनिटाईझ करण्यात आला आहे. तसेच, आरोपींना न्यायालयात आणताना फिजिकल आणि सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

10:22 September 30

कडेकोट सुरक्षा व्यवस्था; न्यायालय परिसराला लष्करी छावणीचे स्वरुप

न्यायालय परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था

या निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अधिवक्ता, सीबीआय काऊंसिल आणि खटल्याशी संबंधित महत्त्वाच्या व्यक्तिंशिवाय अन्य कोणालाही याठिकाणी प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अडवून त्याची चौकशी केली जात आहे.

10:18 September 30

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी आज अंतिम सुनावणी..

अयोध्यामधील बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी तब्बल २८ वर्षांनंतर न्यायालय आज आपला निर्णय जाहीर करणार आहे. यावेळी देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास हे न्यायालयात हजर राहणार नाहीत. कोरोना महामारी आणि या लोकांचे वय लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आले आहेत. न्यायालयात येण्याऐवजी ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीस उपस्थित राहतील.

Last Updated : Sep 30, 2020, 1:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details