हरिद्वार- भाजप सरकार पुन्हा एकदा बहुमताने सत्तेत आले आहे. त्यानिमित्त रामदेब बाबा यांनी या सरकारसमोर लोकसंख्या वाढीच्या प्रश्नासह ३७० कलम काढून टाकण्याचे आव्हान असेल, असे सांगितले. हरिद्वार येथील एका कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
दोन पेक्षा अधिक मुले जन्माला घालणाऱ्यांना शासकीय लाभ देऊ नका - रामदेव बाबा
आगामी काळात संसाधनांची कमतरता भासणार असून त्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात असणे गरजेचे आहे. त्यामुळे येत्या ५० वर्षात देशाची लोकसंख्या १५० कोटींपेक्षा अधिक वाढता कामा नये, असे ते म्हणाले.
देशातील लोकसंख्या ही एक मोठी समस्या असून सरकारने यावर गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. आगामी काळात संसाधनांची कमतरता भासणार असून त्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात असणे गरजेचे आहे. दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देण्याचा अधिकार कोणालाही दिला जाऊ नये. तिसरे मूल झाल्यास त्याला मतदानाचा, निवडणूक लढवण्याचा, आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा अधिकार नाकारावा, असे आवाहन त्यांनी सरकारला केले. येत्या ५० वर्षात देशाची लोकसंख्या १५० कोटींपेक्षा अधिक वाढता कामा नये, असे ते म्हणाले.
देशात एकता प्रस्थापित करण्यासाठी घटनेतील कलम ३७० व ३५-अ काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली. देशात एकच कायदा लागू केल्यानेच लोकशाही बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.