वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रांच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. स्थानिक वेळेनुसार सोमवारी ही बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांना जागतिक संघटनेत सुधारणा घडवून आणण्याचे आवाहन केले. तसेच, त्यांनी 'सुधारीत बहुपक्षीयतेची'ही मागणी केली.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पंतप्रधानांचा हा प्री-रेकॉर्डेड संदेश दाखवण्यात आला. आजच्या काळातील परिस्थितीनुसार आपल्याला सर्व राष्ट्रांच्या बहुपक्षीयतेमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. तसेच, सर्व स्टेकहोल्डर्सना चालना देण्याची, आणि समकालीन आव्हाने सोडवत मानवी कल्याणावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.