नवी दिल्ली - मागील ५ वर्षांत केंद्रातील सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसला पैशांची चणचण भासत आहे. आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना खर्चावर लगाम लावण्यास सांगण्यात आले आहे. काँग्रेसच्या अंतर्गत सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
पक्षाच्या अकाऊंटस विभागाने महासचिव, राज्य प्रभारी आणि अन्य पदाधिकाऱ्यांना खर्चाला आवर घालण्यास सांगितले आहे. आता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या चहा, अल्पोपाहार यांच्यावर होणाऱ्या खर्चाची सीमा दर महिन्याला ३ हजार रुपयांच्या आत असावे. तसेच, यापेक्षा जास्त खर्च झाल्यास संबंधित व्यक्तीने स्वतःच पैसे भरावेत, असे फर्मान काढण्यात आले आहे.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींच्या हस्ते करतारपूर कॉरिडॉरचे ८ नोव्हेंबरला उद्घाटन
अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) च्या कँटीनमधून चहा, अल्पोपाहार दिला जातो. त्या बिलावर सही करून पदाधिकारी ते परत देतात. यानंतर अकाऊंटस विभागाकडून हे बिल भरले जाते.
आणखी एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पक्षाच्या नेत्यांना थोड्या लांबचा प्रवास रेल्वेने करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, दौऱ्यावर गेले असताना रात्री थांबायचे नसल्यास हॉटेलचे बुकुंगही न करण्यास सांगितले आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या एका अहवालानुसार, काँग्रेसला 55.36 कोटींची गंगाजळी मिळाली आहे. पक्षाची संपत्तीमध्ये 2017-18 मध्ये 15 टक्क्यांची घट झाली आहे. वर्ष 2017 ची संपत्ती 854 कोटी रुपये होती. तर, 2018 मध्ये ती 754 कोटी रुपये झाली.
हेही वाचा - मोदी-जिनपिंग भेटीत काश्मीर मुद्द्यावर बातचित नाही - परराष्ट्र सचिव