गुवाहाटी - कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी खबरदाराचा पर्याय म्हणून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, काही ठिकाणी या लॉकडाऊनच्या नियमांना नागरिक धाब्यावर बसवून विनाकारण बाहेर फिरताना दिसतात. तर दुसरीकडे आसाम पोलिसांनी अशा प्रकारे नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारला आहे. गेल्या १९ दिवसात पोलिसांनी कारवाई करत जवळपास १ हजार ४५० जणांना अटक केली आहे. तसेच, अटक केलेल्यांकडून सुमारे ४० लाख रुपये दंडही वसूल करण्यात आला, असल्याची माहिती आसाम पोलिसांनी रविवारी दिली.
आसाम पोलिसांनी त्यांच्या लॉकडाऊनबाबतच्या दैनिक अहवालात सांगितल्यानुसार, त्यांनी संचारबंदीच्या सुरुवातीपासूनच कारवाईचे धोरण आखले होते. यातील जवळपास १ हजार ३८३ प्रकरणातील ७३५ प्रकरणावर गुन्हे दाखल केले असून त्या अनुषंगाने १ हजार ४५४ लोकांना अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, काही जणांवर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले. दंडस्वरूप करण्यात आलेल्या कारवाईतून पोलिसांनी एकूण ३९ लाख ७५ हजार ७०० रुपयांचा दंड आकारला आहे. या व्यतिरिक्त संचारबंदी दरम्यान राज्यातील विविध भागातून सर्व प्रकारच्या ११ हजार २०० वाहनांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.