महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

जेटली होते आणीबाणीतील सत्याग्रही, तुरुंगात काढावे लागले १९ महिने

'तुरुंगात असताना मित्र आणि कुटुंबीय मला पुस्तके पाठवत असत. तसेच, मी तुरुंगातील वाचनालयातूनही पुस्तके घेत असे. मी तुरुंगात संविधान सभेतील संपूर्ण चर्चा वाचली होती. मी खूप काही वाचतो. कधी-कधी लिहितो,' असे जेटली यांनी सांगितले होते.

अरुण जेटली

By

Published : Aug 25, 2019, 9:25 AM IST

नवी दिल्ली - देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर २६ जून, १९७५ ला सकाळी अरुण जेटली यांनी काही लोकांना सोबत घेऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींचा पुतळा जाळला. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ते आणीबाणीतील पहिले सत्याग्रही होते. यानंतर जेटलींना खबरदारी म्हणून अटक करण्यात आली. ते १९७५ पासून १९७७ पर्यंत १९ महिने तुरुंगात होते.

पत्रकार-लेखिका सोनिया सिंह यांचे पुस्तक 'डिफायनिंग इंडिया : थ्रू देयर आईज' मध्ये जेटलींच्या हवाल्याने याविषयी माहिती दिली आहे. 'जेव्हा २५ जून १९७५ च्या मध्यरात्री आणीबाणी घोषित करण्यात आली, तेव्हा पोलीस मला अटक करण्यासाठी आले,' असे या पुस्तकात म्हटले आहे. 'मी जवळच राहणाऱ्या एका मित्राच्या घरी गेल्यामुळे वाचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी काही लोकांना एकत्र आणले आणि श्रीमती इंदिरा गांधींचा पुतळा जाळला. त्यानंतर मला अटक झाली. यामुळे मी आणीबाणीच्या काळात तांत्रिकदृष्ट्या पहिला सत्याग्रही बनलो. कारण, २६ जूनला देशात झालेला हा केवळ एकच विरोध होता. त्यानंतर मी तीन महिने अंबालातील तुरुंगात राहिलो.'

भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी वित्त मंत्री अरुण जेटली यांचे शनिवारी एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना २ आठवड्यांपूर्वी श्वासोच्छवास करण्यास त्रास होत असल्याने एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. ते ६६ वर्षांचे होते. ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) विद्यार्थी नेते होते. १९७० च्या दशकात ते दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्षही बनले. जेटली प्रसिद्ध वकील होते. ते तुरुंगातही अभ्यास करत असत. तसेच, लिहितही असत.

'मित्र आणि कुटुंबीय मला पुस्तके पाठवत असत. तसेच, मी तुरुंगातील वाचनालयातूनही पुस्तके घेत असे. मी तुरुंगात संविधान सभेतील संपूर्ण चर्चा वाचली होती. मी खूप काही वाचतो. कधी-कधी लिहितो,' असे जेटली यांनी सांगितले होते.

दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि आरएसएसचे दिवंगत प्रचारक नानाजी देशमुख यांच्यासह आपणही तुरुंगात राहिल्याचे जेटलींनी सांगितले. सकाळी आणि सांयकाळी बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉलही खेळत असल्याची आठवणही त्यांनी या पुस्तकाच्या निमित्ताने सांगितली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details