पणजी - उत्तर गोव्यातील हडफडे येथील रहिवासी महिला कलाकारावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. शिरीन मोदी (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे. प्राथमिक चौकशीत हा हल्ला त्यांच्या घरी माळीकाम करणारा नोकर प्रफुल जेना (वय 61) याने केल्याचे समोर आले आहे. मात्र, खून करून पळून जाताना या नोकराने कुंपणावरून उडी मारली आणि तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.
शिरीन मोदी खूनप्रकरणी मृत नोकरावर गुन्हा दाखल
गोव्यातील महिला कलाकार शिरीन मोदी यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरी माळीकाम करणारा नोकर प्रफुल जेना (वय 61) याने केल्याचे समोर आले आहे. मात्र, खून करून पळून जाताना या नोकराने कुंपणावरून उडी मारली आणि तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला.
हणजुणे पोलीस निरीक्षक नवलेश देसाई यांनी घटनेविषयी माहिती दिली. शिरीन मोदी या मूळ मुंबईच्या असून मागील 20 वर्षांपासून मुलीसह गोव्यात वास्तव्य करत होत्या. त्यांच्या घरात चार भाडेकरू कुटुंब राहतात. ते सर्वजण एकत्रित जेवण करत असत. जेना त्यांच्याकडे माळी म्हणून काम करत असताना काम व्यवस्थित करत नसल्याने शिरीन त्याला वारंवार सूचना करायच्या. यावरुन दोघांत वाद होत असे. रविवारी असाच वाद झाला आणि जेनाने शिरीन यांच्या डोक्यावर लोखंडी दांड्याने वार केला. त्यावेळी त्या जमिनीवर कोसळल्या. यानंतर नोकराने कुंपणावरून उडी टाकून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घरकाम करणाऱ्या व्यक्तींनी शिरीन यांना गोमेकॉत दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस निरीक्षक देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली हणजुणे पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.