समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या तरुणपणात समाजासाठी संपत्तीची आणि सामाजिक मूल्यांची निर्मिती करुन योगदान दिले आहे. याची अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. संपूर्ण आयुष्य ज्यांनी आपल्या मुलांसाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग केला, त्या ज्येष्ठ नागरिकांकडेच आता दुर्लक्ष केले जात आहे.
ज्या ज्येष्ठ व्यक्तींनी आतापर्यंत अनेकांना मदतीचा हात दिला, ते आता येणाऱ्या पिढीकडे मदतीचा हात मागत आहेत. त्यांनी पूर्वी प्रेम आणि आपुलकी दिल्याने त्याच प्रेम आणि आपलेपणाची ते जिवलगांकडून अपेक्षा करत आहेत. आत्ताच्या तरुण पिढीने त्यांना आनंदी ठेवावे, आपुलकीचा हात पुढे करावा आणि ते आजारी असतील तर त्यांची काळजी घ्यावी अशी त्यांची अपेक्षा आहे.
हेही वाचा - नो टू सिंगल यूज प्लास्टिक : प्लास्टिकपासून खनिज तेलाची निर्मिती!
ज्येष्ठांना ते समाजावर ओझे आहेत, असे वाटू न देण्याचे आवाहन आपल्या सर्वांसमोर आहे. कारण जीवनमान वाढल्याने ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्याही वाढत आहे. भारतात ज्येष्ठांची लोकसंख्या हळूहळू वाढत आहे. स्वातंत्र्यचळवळी दरम्यान भारतीयांचे आयुष्यमान ४१ वर्षे होते, आज ते वाढून ६९ वर्षे झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात झालेली क्रांती, राहणीमानाच्या दर्जात झालेली वाढ आणि पोषक खाद्यपदार्थांमुळे माणसाच्या जीवनमानात वाढ झाली असून ही एक चांगली बाब आहे. अनेक देशांत हीच स्थिती आहे. चीननंतर ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आव्हान का?
भारतात प्रत्येकी दहा लोकांमध्ये एक ज्येष्ठ नागरिक आहे. २०५० पर्यंत भारतात वृद्ध लोकांची संख्या ४० कोटींचा आकडा पार करून जाईल, असा अंदाज आहे. भारतातील वृद्ध वयोगटातील लोकांपैकी ७० लाख वृद्ध हे घरातच अडकून आहेत, तर २५ लाख हे अंथरूणाला खिळून आहेत. काम करण्यास सक्षम असलेल्या लोकांचा एक मोठा समूह त्यांना मदत करण्यात गुंतलेला आहे. त्यामुळे हा समूहदेखील उत्पादन क्षेत्रापासून दूर आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, निवृत्तीनंतर पुरुष १७ वर्षे तर महिला २१ वर्षे जगण्याची शक्यता आहे. आरोग्याचे प्रश्न असूनही, बहुतेकजण निवृत्तीवेतन सुविधा योग्य प्रकारे नसल्याने आजही काम करत आहेत. आर्थिक चणचण असल्याने, वृद्ध लोकांना पोषक आहार मिळत नाही. त्यामुळे त्यांना नैराश्य येऊन शारीरिक आणि मानसिक आजारांची लागण होते. इतरत्र विस्थापित होणारे कुटुंब ज्येष्ठांना घरात एकटे सोडून जातात किंवा वृद्धाश्रमात दाखल करतात.
आपण काय करायला हवे?
ज्येष्ठ नागरिकांची सर्वात मोठी समस्या त्यांना जाणवणारा एकटेपणा ही आहे. मुलांकडून प्रेम आणि आपुलकी मिळत नसल्याने वृद्ध लोक नेहमीच नैराश्यात (डिप्रेशन) असतात. यावर तोडगा काढणे हे आपल्या हातात आहे. त्यांना नियमित भेटणे, फोनवर वारंवार त्यांच्याशी बोलणे, त्यांना तुम्ही त्यांच्यासोबत असल्याची खात्री करुन देणे, त्यांना नवीन कपडे, सजावटीच्या वस्तू देऊन प्रोत्साहित करणे, त्यांना त्यांच्या स्वतःच्या शरीरावर प्रेम करायला शिकवणे, यासारख्या गोष्टी करून आपण ज्येष्ठ नागरिकांना मदत करू शकतो.
ज्येष्ठ नागरिकांना सामाजिक बैठका, पूजास्थळे, बगिचे अशी ठिकाणी घेऊन जाणे. नृत्य, संगीत, साहित्य असा छंद असलेल्यांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी पुढाकार घेणे. सेलफोन कसा वापरायचा, ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार याबाबत त्यांना शिक्षित करणे यासारख्या गोष्टींमधूनही आपण त्यांची मदत करु शकतो.
ज्येष्ठ नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी सरकारने आरोग्य केंद्रे स्थापन करून त्यांना विनामूल्य आरोग्य सेवा पुरवली पाहिजे. त्यांच्या घराच्या परिसरातच आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन दिली पाहिजे. भारतात अनेक शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ लोक अजूनही अत्यंत सक्रियपणे काम करत आहेत. शहरात मात्र, हे प्रमाण खूपच कमी आहे. जर्मनी आणि जपानमध्ये वृद्ध नागरिकांची लोकसंख्या जास्त आहे. मात्र, तेथे उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि गॅजेट्सचा उपयोग करून ते घरातूनच काम करू शकतात.
जपानचे अनुकरण करा
जपानमध्ये वयोवृद्धांची लोकसंख्या साडेतीन कोटी असून त्यापैकी २० लाख वृद्ध ९० वर्षांच्या वरचे आहेत. ७० हजार लोकांनी शंभरी पार केलेली आहे. जपानमध्ये २०३० पर्यंत, प्रत्येक तीन लोकांपैकी एकजण ६५ वर्षांच्या वरच्या वयाचा असेल. येत्या दोन दशकात, जपानचा जीडीपी १ टक्क्यांनी खाली घसरणार असून त्यांचे सरकार या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी आदर्श पावले उचलत आहे. तेथील ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या आहाराच्या सवयी लावल्या जात आहेत. मेद वाढवणाऱ्या मांसाहारी पदार्थांपेक्षा फळे, भाज्या, मासे आणि सोया उत्पादने पुरवली जात आहेत. याचा परिणाम म्हणून जपानमध्ये ह्रदयाशी संबंधित विकारांमुळे होणाऱ्या मृत्यू प्रमाणात ३६ टक्क्यांनी घट झाली आहे. जपानचे सरकार वयोवृद्धांच्या आरोग्याचा खर्च उचलते आणि त्यांना निवृत्तीवेतनही देते.
त्यांना जेवणाच्या वेळेत, बागांमध्ये तसेच व्यायामकेंद्रात (जिम) मदत करण्यासाठी विशेष रोबो तयार करण्यात आले आहेत. तेथील ज्येष्ठ नागरिक काम करून राष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेला पाठबळ देतात. जपानमध्ये वृद्धांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून मानले जाते. आदर दिला जातो आणि घरं, कामाच्या ठिकाणी तसेच प्रवासी वाहनांमध्येही सर्वोच्च प्राधान्य दिले जाते.
भारतात ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत सरकार प्रधानमंत्री वयोवृद्ध योजना, आयुष्यमान भारत योजना राबवते आहे. आरोग्यश्री योजनेंतर्गत आंध्र प्रदेशात त्यांना २ हजार २५० रुपयांची पेन्शन दिली जाते, तर तामिळनाडूमध्ये २ हजार १६ रुपये निवृत्तीवेतन दिले जाते. मात्र, फक्त इतकेच करून भागणार नाही. वृद्ध नागरिकांसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.