शिमला -हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथे बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबलेले ५ जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या जवानांचे मृतदेह काढण्याचे काम गेल्या २३ दिवसांपासून सुरू होते. यापूर्वी ३ जवानांचे मृतदेह शोधले होते, तर आज उर्वरित २ जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. किन्नौरच्या नमज्ञा डोंगरी येथील ग्लेशियरजवळ हिमस्खलनामुळे हे जवान बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबलेले होते.
आज शोधण्यात आलेले जवानांचे नावे विदेश ठाकूर आणि अर्जुन असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळपासूनच बचावमोहिम सुरू करण्यात आली होती. जवानांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
काय आहे घटना?
किन्नौरच्या नमज्ञा डोंगरीमध्ये २० फेब्रुवारी रोजी पाण्याची पाईपलाईन ठीक करण्यासाठी लष्कर आणि आयटीबीपीचे १६ जवान याठिकाणी गेले होते. अचानक हिमस्खलन झाल्यामुळे यात ४ आयटीबीपी आणि ६ लष्कराचे जवान ढिगाऱ्याखाली दबले होते. या घटनेत आयटीबीपीचे जवान सुखरूप वाचले मात्र लष्कराचे जवान ढिगाऱ्याखाली दबून गेले. गेल्या २३ दिवसांपासून सतत या जवानांसाठी शोधमोहिम सुरू होती. लष्कर, आयटीबीपी, लष्कराची विशेष टीम, स्निफर डॉग, डीआरडीओची टीम, थर्मल डिटेक्टर, मेटल डिटेक्टर, रडार यंत्रणा आणि स्थानिकांच्या मदतीने जवानांचे मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी बचाव पथकाने सेनेच्या एका जवानाचा मृतदेह शोधून काढला होता. राकेश कुमार असे त्यांचे नाव होते. २ मार्च रोजी बचाव पथकाला नालागडच्या राजेश ऋषी यांचा मृतदेह मिळाला होता. ४ मार्चला पश्चिम बंगालच्या गोविंद छेत्री आणि ९ मार्चला कांगडाचे नितीन राणा यांचा मृतदेह शोधण्यात आला होता.