श्रीनगर - भारतीय लष्कराच्या 'खैरियत' पथकाने एका गर्भवती महिलेचे प्राण वाचवल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला प्रसूती-संबंधी त्रास जाणवू लागल्यामुळे तिचे आणि तिच्या बाळाचे आयुष्य धोक्यात आले होते. तेव्हा तिच्या मदतीला धावलेल्या लष्कराने तिला स्ट्रेचरवर उचलून नेत कितीतरी किलोमीटर दूर असलेल्या रुग्णालयात दाखल केले. जवानांनी घेतलेल्या या मेहनतीमुळे ती महिला वेळेत रुग्णालयात पोहोचली आणि तिने एका सुदृढ बालकाला जन्म दिला.
मंगळवारी लष्कराच्या या पथकाला दर्द पोरा गावात राहणाऱ्या रियाज मीर यांचा फोन आला. फोनवर त्यांनी सांगितले की त्यांच्या पत्नीला प्रसूतीकळा येत आहेत आणि हिमवर्षावामुळे रस्ते बंद झाल्यामुळे आम्ही तिला रुग्णालयात नेऊ शकत नाही. यादरम्यान त्या महिलेला प्रसूतीसंबंधी त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे तिला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते.
फोनवर ही माहिती मिळताच बेस कमांडर यांनी तत्काळ लष्कराच्या या तुकडीला पाचारण केले. ही तुकडी कमरेपर्यंतच्या बर्फामधून वाट काढत साधारणपणे पाच किलोमीटर दूर असलेल्या या गावात पोहोचली. त्यांच्यासोबत स्थानिक वैद्यकीय अधिकारीही होते. तिथे त्यांना समजले की, महिलेला रुग्णालयात नेणे अत्यावश्यक आहे. हे समजताच जवानांनी तातडीने निर्णय घेत,आपल्या पथकाच्या तीन तुकड्या केल्या.